कोहिमा : नागालँडमध्ये अतिवृष्टीमुळे मंगळवारीदेखील पूर आणि भूस्खलनाच्या घटना नोंदवण्यात आल्या. मोन जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू झाला असून आणखी चार जणांचा शोध सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे राज्यात पावसाच्या बळींची संख्या नऊ झाली आहे.

पावसामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून रस्त्यांसह अनेक पायाभूत सुविधा, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यभरात दहा जिल्हे अतिवृष्टीने बाधित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये सर्वाधिक फटका मोन जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या मोन शहरातच दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पावसाचे बळी याच जिल्ह्यात नोंदवण्यात आले असून तो आकडा नऊ वर पोहोचला आहे. दरम्यान, पुरातून चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. चार जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

आसाममध्ये मृतांची संख्या ११ वर

आसाममधील पूरपरिस्थिती मंगळवारीदेखील कायम असून चराईदेव जिल्ह्यात मंगळवारी पुरात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यात पुरातील बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे. ११ जिल्ह्यांतील तीन लाखांहून अधिक लोक या पुराने बाधित झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

ब्रह्मपुत्रा, दिखाव, देसांग आणि धन्सिरी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व अन्य आपत्कालीन यंत्रणांकडून येथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आसामच्या उत्तरेकडील भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून येथील रेल्वे वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली. राज्यात एकूण ५२ मदत केंद्र उभारण्यात आले असून येथे १२ हजार ७२० जणांच्या सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

हिमाचलमध्येही ‘रेड अलर्ट’

हिमाचल प्रदेशातही चंबा, कांगरा, कुल्लू, मंडी आणि सिरमौर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील शाळा, महाविद्यालय मंगळवारी बंद ठेवण्यात आले. येथील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून रस्ते वाहतूक त्यामुळे प्रभावित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा पुन्हा सुरू

उत्तराखंडमध्ये गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीनंतर जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. पावसामुळे स्थगित करण्यात आलेली चारधाम यात्रा मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. येथील देहरादून-मसुरी रस्ता यापूर्वी पावसामुळे बंद ठेवण्यात आला होता. मंगळवारपासून तो हलक्या वाहनांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.