NEET Paper Leak: शिक्षणामुळे आपल्या कुटुंबाची गरिबी दूर होईल, या एकाच स्वप्नाने एका शेतकरी कुटुंबाला आशेचा किरण दाखवला होता. पण, याच स्वप्नाचा शेवट अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक झाला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘NEET’ मधील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांमुळे नैराश्यात आलेल्या आकांक्षा चतुर्वेदी या १८ वर्षीय विद्यार्थिनीने नागपुरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील असणारी आकांक्षा, नागपूर येथील एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमधून ‘नीट’ परीक्षेची तयारी करत होती. २० मे रोजी तिने तिच्या खोलीत आत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता घटनेच्या काही दिवसांनंतर तिच्या कुटुंबियांना आकांक्षाने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यातील शब्द कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणतील असे आहेत.

“आई-बाबा, मला माफ करा; सर्वकाही संपलं…”

आकांक्षाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तिने लिहिले, “आई आणि बाबा, तुमची मुलगी मनापासून अभ्यास करून एक दिवस डॉक्टर बनेल, असा विश्वास तुम्हाला होता. पण आता माझ्यामध्ये पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिंमत उरलेली नाही. पहिल्या प्रयत्नात मला चांगले गुण मिळत होते, पण आता पुन्हा चांगली कामगिरी करता येईलच याची कोणतीही गॅरंटी नाही. आय एम सॉरी आई-बाबा… मी सगळं काही उद्ध्वस्त केलं.”

मुलीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी वडिलांनी उचलले होते ‘हे’ पाऊल

आकांक्षा मऊगंज जिल्ह्यातील मगेनिया गावची रहिवासी होती. तिचे वडील कृष्णकुमार चौबे हे अत्यंत अल्पभूधारक शेतकरी आहेत. आपल्या लाडक्या मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त आर्थिक जोखीम पत्करली होती. शेतीतून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आकांक्षाच्या कोचिंगची फी भरता यावी म्हणून ते नागपुरात एका ठिकाणी आचाऱ्याचे (स्वयंपाकी) काम करत होते.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाच्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी कुटुंबाने ‘किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) द्वारे सुमारे ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. इतकेच नव्हे तर, इतर नातेवाईकांकडूनही त्यांनी आर्थिक मदत घेतली होती.

“६५० हून अधिक गुण मिळतील” असा होता विश्वास, पण…

आकांक्षाचे काका जगदीश प्रसाद चतुर्वेदी यांनी सांगितले की, परीक्षा देऊन जेव्हा आकांक्षा घरी परतली, तेव्हा तिचा आत्मविश्वास गगनात मावेनासा होता. “परीक्षा संपल्यावर ती खूप आनंदात होती. आपल्याला ६५० पेक्षा जास्त गुण मिळतील, अशी खात्री तिने आम्हाला दिली होती,” असे जगदीश प्रसाद म्हणाले. पुढे बोलताना ते भावुक झाले, “पण जेव्हापासून नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या आणि गैरव्यवहाराच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने जेवण खाणे सोडले, ती कोणाशी जास्त बोलत नव्हती आणि सतत तणावाखाली असायची. पण या सगळ्याचा शेवट इतका भयानक होईल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती.”

परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादामुळे आकांक्षा पूर्णपणे खचून गेली होती, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. एवढी मेहनत करून आणि परीक्षेत चांगली कामगिरी करूनही, या घोटाळ्यांमुळे आपल्या कष्टाला काहीच किंमत उरणार नाही, अशी भीती तिच्या मनात घर करून बसली होती.

व्यवस्थेच्या गोंधळात एका स्वप्नाचा करुण अंत

या घटनेनंतर मऊगंज परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. वर्षानुवर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर अशा परीक्षांमधील गोंधळाचा किती भयानक परिणाम होतो, यावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आकांक्षाच्या घरात आज तिच्या अभ्यासाची पुस्तके, नोट्स आणि तिने पाहिलेली स्वप्ने तशीच पडून आहेत. ज्या मुलीला पांढरा कोट घालून डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करायची होती, तिच्या मागे आता उरल्या आहेत केवळ आठवणी आणि तिने लिहिलेली एक माफीनामा असलेली चिठ्ठी.