पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी ज्येष्ठ पत्रकार नजम सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील हा प्रांत दाट लोकसंख्येचा तसेच राजकीयदृष्टय़ा अत्यंत गुंतागुंतीचा मानला जातो. पाकिस्तानात येत्या ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असतानाच पंजाब प्रांताच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पंजाब प्रांतावर आतापर्यंत पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) गटाची राजवट होती.
सेठी यांचे नाव पंजाबमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने सुचविले होते आणि सेठी यांच्या उमेदवारीस आपला काही आक्षेप नसल्याचे लीगकडून स्पष्ट करण्यात आले.
त्याआधी, पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाझ शरीफ यांनी विरोधकांच्या नावास आपली असहमती दर्शविली होती.
यानंतर हा विषय संबंधित समितीकडे सोपविण्यात आला. तीन दिवसांच्या चर्चेनंतर सेठी यांच्या नावावर एकमत झाले. लीगचे पक्षप्रमुख नवाझ शरीफ आणि त्यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांच्या मनात सेठी यांच्याबद्दल काही आक्षेप होते. परंतु ही बाब निवडणूक आयोगाकडे गेली असती तर त्यांनी सुचविलेल्या उमेदवारापेक्षा सेठी हे निश्चितच उजवे ठरले असते, हे शरीफ बंधूंच्या लक्षात आले आणि त्यामुळे त्यांनी सेठी यांच्या उमेदवारीस मान्यता दिली.
नजम सेठी हे पाकिस्तानातील ‘जिओ’ वृत्तवाहिनीवर ‘आपस की बात’ हा कार्यक्रम चालवितात. आधी ते ‘डेली टाइम्स’ व ‘डेली आजकल’चे संपादक होते.