CJI Convocation Protest NALSAR: हैदराबाद येथील ‘नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च’ (NALSAR) युनिव्हर्सिटीच्या काही पदवीधर विद्यार्थ्यांनी भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना विद्यापीठाच्या २०२६ च्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी दिलेल्या आमंत्रणाला विरोध केला आहे. २०२६ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांच्या एका गटाने कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आणि इतर विद्यापीठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून सरन्यायाधीशांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या पत्रात अलीकडील न्यायालयीन घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये जंतरमंतर येथील आंदोलनाबाबत सरन्यायाधीशांचे वक्तव्य आणि त्यांनी भारतीय तरुणांची तुलना ‘झुरळांशी’ (कॉकरोच) केल्याच्या कथित आरोपाचा समावेश आहे. पत्रानुसार, “आम्ही, स्वाक्षरीकर्ते विद्यार्थी, पदवीधर बॅचच्या चिंतेशी सहमत आहोत. सरन्यायाधीशांनी तरुणांचा ‘झुरळे’ असा उल्लेख करण्यापासून ते आंदोलनातील व्हिडिओ पाहण्यास वेळ नसल्यासारखी असंवेदनशील विधाने करून आमच्यासारख्या विद्यार्थ्यांबद्दल उदासीनता दाखवली आहे. शैक्षणिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या पदव्या देण्यासाठी त्यांना आमंत्रित करणे आम्हाला योग्य वाटत नाही.”

अशा परिस्थितीत सरन्यायाधीशांना आमंत्रित करणे हे घटनात्मक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूल्यांशी विसंगत ठरेल, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला.

‘टिस’नेही (TISS) दीक्षांत समारंभ पुढे ढकलला

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी, मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (TISS) ने २ ऑगस्ट रोजी होणारा आपला ८६ वा दीक्षांत समारंभ अवघ्या दोन दिवस आधी पुढे ढकलला होता. संभाव्य आंदोलनांमुळे कार्यक्रमात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा सुरक्षाविषयक चिंतेमुळे हा ऐनवेळचा निर्णय घेण्यात आला. या समारंभाला भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते.

‘टिस’ने विद्यार्थ्यांना पाठवलेल्या निवेदनात “अपरिहार्य परिस्थिती”त हा समारंभ पुढे ढकलण्याचे कारण सांगितले होते. संस्थेने अधिकृतपणे या निर्णयाचा सरन्यायाधीशांच्या दौऱ्याशी किंवा संभाव्य आंदोलनांशी कोणताही संबंध जोडलेला नाही. या निर्णयामुळे पदवीधर विद्यार्थी, विशेषतः ज्यांनी प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था केली होती, ते नाराज झाले आहेत.