NALSAR : हैदराबाद येथील ‘नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च’ (NALSAR) युनिव्हर्सिटीच्या काही पदवीधर विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना विद्यापीठाच्या २०२६ च्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यास विरोध केला होता. २०२६ च्या बॅचमधील काही विद्यार्थ्यांनी या संदर्भात कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहून सरन्यायाधीशांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतर या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल ऑफ इंडियाने कारवाई करत २०२६ च्या बॅचची नोंदणी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर काही तासांत हा निर्णय मागे घेण्यात आला.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तसेच यावरून कॉकरोच जनता पार्टीनेही आंदोलाचा इशारा दिला होता. तसेच सरन्यायाधीशांनी देखील यावरून बार कौन्सिलला फटकारलं होतं. या घडामोडीनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.
मनन कुमार मिश्रा यांनी काय म्हटलं?
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा खासदार मनन कुमार मिश्रा यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत एक निवेदन जारी केलं आहे. मिश्रा यांनी म्हटलं की, “गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे विद्यार्थ्यांच्या एका गटात नाराजी निर्माण झाली आहे. जेव्हा-जेव्हा विद्यार्थ्यांना अडचणी किंवा समस्या असतात, तेव्हा त्या आदराने ऐकून घेतल्या गेल्या पाहिजेत. सध्याच्या वादाशी संबंधित माझ्या कोणत्याही शब्दामुळे किंवा पत्रामुळे जर आपल्या विधी शाखेतील विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो आणि माफी मागतो”, असं मनन कुमार मिश्रा यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
Bar Council of India Chairman and Rajya Sabha MP Manan Kumar Mishra issues a statement –
— ANI (@ANI) August 15, 2026
"…The developments of the last few days have caused concern and anguish among a section of the student community. Whenever students feel hurt or aggrieved, their concerns deserve to be… pic.twitter.com/2zX4RGduT1
“हे मान्य करण्यात कोणताही संकोच नसावा. खेद व्यक्त करणं ही प्रतिष्ठेची किंवा अहंकाराची बाब नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत, याची ही एक कबुली आहे. मला मनापासून आशा आहे की, आता या विषयाकडे निष्पक्षपणे आणि सामंजस्याच्या भावनेनं पाहिलं जाईल. आता या विषयाला राजकीय किंवा अनावश्यक वळण मिळू नये”, असंही मनन कुमार मिश्रा यांनी म्हटलं आहे.
नालसार विद्यापीठात नेमकं काय घडलं होतं?
नालसार विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या १४०० विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४५० विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याविरोधात सुरू केलेल्या मोहिमेपासून या वादाला सुरुवात झाली होती. दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जसंदर्भात सुनावणी चालू असताना सरन्यायाधीशांनी या घटनेचे व्हिडीओ पाहण्याची विनंती केली असता “कृपया आमचा वेळ वाया घालवू नका, आमच्याकडे हे व्हिडीओ पाहत बसण्यासाठी वेळ नाही”, असं कथित विधान त्यांनी केल्याचा दावा करण्यात आला होता. सरन्यायाधीशांच्या याच विधानाचा तीव्र निषेध नालसारमधील विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये आपली नापसंती दर्शवली होती आणि सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास विरोध केला होता. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व्यवस्थापनाला सरन्यायाधीश सूर्य कांत यांना पदवीदान समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून पाचारण करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अचानक बार कौन्सिल ऑफ इंडियानं कायद्याचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या २०२६ बॅचच्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणीच थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर कॉक्रोज जनता पार्टीनेही बार कौन्सिलच्या या निर्णयाचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर अखेर बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. तसेच या प्रकरणावर सर्वोच्च न्याययालयात सुनावणी चालू असताना सरन्यायाधीशांनी बार कौन्सिलच्या निर्णयावर ताशेरे ओढले होते.
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी यासंदर्भात बीसीआयला कठोर शब्दांत सुनावलं होतं. “बीसीआयनं अशा प्रकारची कारवाई करणं अजिबात अपेक्षित नव्हतं. हा सगळा संवाद माझ्या आणि विद्यार्थ्यांच्या मधला आहे. मग यात आक्षेप घेणारं BCI कोण आहे? माझ्या विद्यार्थीदशेत मीदेखील अशा मोहिमांचा भाग होतो. आपण असं जरी मानलं की विद्यार्थी चुकीचे होते, तरीदेखील त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. यात BCI चा काहीही संबंध नाही”, असं सरन्यायाधीश म्हणाले होते. या सर्व घडामोडीनंतर अखेर आता बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.
