अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे करोना विषाणू गुजरातमध्ये पसरला, असा आरोप काँगेसनं केला आहे. तसेच याची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही गुजरात काँग्रेसनं केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम करोनामुळे वादात आला आहे. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये करोना पसरला, असा दावा गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी केला आहे. “जागतिक आरोग्य संघटनेनं जानेवारीमध्येच करोनाचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचं आवाहन त्याचवेळी आरोग्य संघटनेनं केलं होतं. मात्र, आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून राजकीय लाभासाठी नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्याला गुजरात सरकारनंही परवानगी दिली. या मोठ्या कार्यक्रमामुळे हजारो परदेशी नागरिक अहमदाबादला आले आणि त्यामुळे करोना पसरला. त्यामुळे यासंदर्भात आम्ही गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत.

करोनाचा महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातला मोठा फटका बसला आहे. गुजरातमध्ये २० मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळून आला होता. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाला महिना झाल्यानंतर हा रुग्ण आढळून आला होता. सध्या गुजरातमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६ हजार २४५ इतकी आहे. तर ३६८ जणांचे संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे.