Drought In Namibia : आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाची सर्वाधिक झळ नामिबिया या देशाला बसली आहे. या देशात लोकांना खायला अन्नही मिळत नसल्याचं चित्र आहे. अशा स्थितीत भूकबळीने आपल्या नारिकांचा मृत्यू होऊ नये यासाठी, ८३ हत्तींसह जंगलातील ७२३ प्राणी मारुन त्यांचं मास जनतेला खायला देण्याचे आदेश नामिबिया सरकारने दिले आहेत. रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नामिबिया सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. सरकारने ८३ हत्ती, ३०० झेब्रा, ३० पाणघोडे, ६० म्हशी यासह एकूण ७२३ प्राणी मारण्याचे आणि त्यांचे मांस जनतेला खायला देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे अन्नाची गरज भागेल तसेच प्राणी संवर्धनावरील सरकारचा खर्चही कमी होईल, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. सरकारने नामिब नौक्लुफ्ट पार्क, मँगेट्टी नॅशनल पार्क, ब्वाबवाता नॅशनल पार्क, आणि एनकासा रुपारा नॅशनल पार्क येथील प्राण्यांना मारण्याचे आदेश दिल्याची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसा दिवशी आणलेल्या पवन चित्त्याचा मृत्यू; नामिबियावरून आणलेले ७ चित्ते मृत्यूमुखी
काही आफ्रिकन देश सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. या देशांमधील अन्नसाठा जवळपास संपुष्टात आला आहे. अनेकांना खायला अन्नही मिळत नसल्याची परिस्थिती आहे. संयुक्त राष्ट्राने पुढच्या काही महिन्यांत नामिबियात आणखी भीषण अन्न टंचाई होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारद्वारे हा निर्णय घेण्यात आल्याचं नामिबिया सरकारचं म्हणणं आहे.
महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारे प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस जनतेला खायला देण्याची ही पहिलीच वेळ नाही. नामिबियाने यापूर्वी सुद्धा अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात सरकारने २०० पेक्षा जास्त प्राणी मारण्याची आदेश दिले होते.