Cheetah Pawan dies at Kuno National Park: नामिबियावरून आणलेले चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात अधिवासात होते. याठिकाणी मंगळवारी पवन नामक चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. ५ ऑगस्ट रोजी कुनोमध्येच पाच महिन्यांचा आफ्रिकन चित्ता जेमीनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच पवनच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. पवनच्या मृत्यूनंतर आता कुनो राष्ट्रीय उद्यानात २४ चित्ता उरले आहेत. त्यापैकी १२ मोठे आणि तेवढेच नवजात पिले आहेत.
सिंह प्रकल्पाचे संचालक आणि एपीसीसीएफ प्रकल्पाचे अधिकारी उत्तम शर्मा यांनी यावर एक निवेदन प्रसिद्ध करून पवनच्या मृत्यूबाबत माहिती दिली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कुनोमधील एका नाल्यात पवनचा मृतदेह आढळल्याचे त्यांनी सांगितले. पशुवैद्यांनी पवनच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता पवन पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत.
हे वाचा >> चित्ता प्रकल्पाला दोन वर्ष… काय चुकले? काय फळले? काय बोध?
पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी भारतात आगमन
पवनला १७ सप्टेंबर २०२२ रोजी पतंप्रधान मोदींच्या जन्मदिनी नामिबियावरून भारतात आणले गेले होते. पहिल्या खेपेस आठ चित्ते आणले गेले होते. यात पाच मादी व तीन नर चित्त्यांचा समावेश होता. ज्यामध्ये पवन सर्वात वेगात पळणारा चिता असल्याचे सांगितले जात होते. पवनच्या मृत्यूचे खरे कारण समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. तर दुसऱ्या तुकडीत १८ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते भारतात आले. यात सात नर आणि पाच मादी चित्त्यांचा समावेश होता. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांची रवानगी करण्यात आली.
आतापर्यंत १२ चित्त्यांचा मृत्यू
भारतात चित्त्यांचे आगमन झाल्यानंतर २६ मार्च २०२३ रोजी साशा मादीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उदय, दक्षा, तेजस, सूरज, धात्री, शौर्य आणि आता पवन यांचा मृत्यू झाला आहे. तर पाच नवाजत पिलांचाही मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण १२ चित्त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.