Namita Thapar : नमिता थापर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये नमाजचे फायदे सांगितले त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतं आहे. एमक्योर या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या पूर्णवेळ संचालक आणि उद्योजिका अशी नमिता थापर यांची ओळख आहे. तसंच शार्क टँक इंडिया या रिअॅलिटी शोच्या परीक्षक म्हणूनही त्या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केल्याने त्यांना वाट्टेल ते बोललं गेलं. अगदी अश्लाघ्य शब्दांमध्येही त्यांच्यावर टीका झाली. या सगळ्या ट्रोलर्सना नमिता थापर यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. आपण जाणून घेऊ हे सगळं प्रकरण काय? तसंच नमिता थापर यांनी नेमकं काय उत्तर दिलं?
नमिता थापर नमाजबाबत काय म्हणाल्या होत्या?
मी आज ईद साजरी केली. माझ्यासह माझे जवळचे मित्र-मैत्रिणी होते. मला त्यांनी सांगितलं की नमिता तू आरोग्याबाबत कायम सांगत असतेस पण तुला नमाज पठणाचे फायदे माहीत आहेत का? असं म्हणत नमाजचे फायदे नमिता थापर यांनी सांगितले. त्यावरुनच त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं.
नमाजचे फायदे काय? काय म्हणाल्या नमिता थापर?
१) नमाज पठण हा संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. त्यामुळे तुमचं रक्ताभिसरण चांगलं होतं. तसंच तुमचे सांधे आणि गुडघे यांच्यासाठी नमाज पठण हा एक उत्तम व्यायाम आहे.
२) नमाज पठण हे एक प्रकारे ध्यानधारणेसारखं आहे. ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते.
३) नमाज पठणात तुम्ही वज्रासनात बसता, त्यामुळे पचन चांगलं होतं.
४) दिवसातून पाचवेळा नमाज पठण करण्याची जी पद्धत आहे ती अवलंबल्याने शरीराला एक प्रकारे चांगला व्यायाम घडतो.
५) नमाज पठण हे अनेक लोकांसह केलं जातं त्यामुळे तुमचा समाजाशी असलेला संपर्क वाढतो. प्रत्येक धर्मात प्रार्थना करण्याचं वेगळं महत्त्व असतं. नमाज पठणामध्ये तुम्हाला आरोग्यदायी फायदेही होतात हे काही नाकारता येणार नाही.

असे पाच मुद्दे नमिता थापर यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये मांडले होते. हा व्हिडीओ त्यांनी तीन आठवड्यांपूर्वी पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यांच्या या म्हणण्यावरुन त्यांना ट्रोल केलं जाऊ लागलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट काय आहेत?
एका युजरने म्हटलं आहे की तुम्ही एक दिवस सांगाल की बुरखा स्कीन केअरसाठी चांगला असतो. आणखी एका युजरने म्हटलं आहे नमाजचं महत्त्व सांगितलंत ठीक आहे आपल्या धर्मातील आरतीचं महत्वही विशद करा. नमाज पठण तुम्हीच करा आम्ही तर जय श्रीराम म्हणणारे आहोत असंही एका युजरने म्हटलं आहे. नमाजचे फायदे सांगितलेत पण हलालाचे फायदे काय असतात ते पण जरा लोकांना सांगा. नमाज इतका आवडत असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारा असंही काही युजर्स म्हणाले आहेत. TCS सारखं धर्मांतरण तुमच्याही कंपनीत सुरु झालं का मॅडम? असंही काही युजर्सनी त्यांना विचारलं आहे.

नमिता थापर यांनी नव्या व्हिडीओत काय म्हटलं आहे?
नमिता थापर यांचा आता एक नवा व्हिडीओ आला आहे. त्यात त्या म्हणाल्या की त्या बऱ्याच काळापासून योग आणि त्यामुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल बोलत आलेल्या आहेत. पण, त्यावर कधीच चर्चा झाली नाही. मागील तीन आठवड्यांपासून लोक मला शिव्या देत आहेत, अश्लील शब्दांमध्ये माझ्याविषयी बोलत आहेत. माझ्या आईलाही शिव्या देत आहेत. कशासाठी तर मी नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितले म्हणून? मी हेल्थकेअरसाठी काम करते. मी हिंदू धर्मातील विविध प्रार्थना पद्धतींवर रिल्स तयार केल्या आहेत. सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले आहेत. योग दिवसाच्या दिवशीही मी रिल्स करते आहे. त्यावेळी कुणीही काहीही बोललं नाही. आता अचानक मला घाणेरड्या शब्दांमध्ये ट्रोल केलं जातं आहे. महिलांबाबत आदर बाळगा असं सांगितलं जातं, समाजाने मला असं काही संबोधणं म्हणजे आदर आहे का? माझा आणि माझ्या आईचा अपमान केला गेला तरी अनेक लोक गप्प बसले आहेत. कारण हे मी मागेच शिकले आहे की तुमच्यासाठी कुणीही आवाज उठवत नाही. मी हिंदू धर्म मानते आणि मला हिंदू धर्माचा अभिमान आहे. तुम्ही ट्रोल्स करत राहा, देव सगळं पाहतो आहे. तसंच जे शिकलेले हिंदू आहेत त्यांना इतकंच आवाहन आहे की माझा तो व्हिडीओ जसा व्हायरल केलात तसा हादेखील करा. तरच तुम्हाला महिलांबाबत आदर आहे हे मला जाणवेल.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या रीलवर आतापर्यंत ३९ हजारहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. मात्र, या रीलवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जण नमिता थापर यांची प्रशंसा करत आहेत आणि नमिता थापर यांना खंबीर राहण्याचा सल्ला देत आहेत, तर काही जण त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान नमिता थापर यांच्या दोन्ही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
