NEET Exam : नीट पेपरफुटीचा मुद्दा काही महिन्यांपूर्वी चांगलाच गाजला. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्लीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारने परीक्षांमधील सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटी रोखण्याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च-स्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.
नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आल्यानंतर आता परीक्षा पद्धत अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यासाठी नंदन निलेकणी यांनी एक ‘मास्टर प्लॅन’ तयार केल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी आता नेमकं काय बदल करण्यात येणार आहेत? ‘टास्क फोर्स’ची योजना काय असणार? त्यामुळे परीक्षांमध्ये नेमकं काय सुधारणा होणार? याबाबत पहिल्यांदाच नंदन निलेकणी यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार होणार?
एका मोठ्या प्रश्नसंग्रहातून ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना टास्क फोर्सचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी दिली आहे. या बरोबरच देशभरात संगणक-आधारित परीक्षांची व्याप्ती वाढवण्यावर नंदन निलेकणी यांनी भर दिला आहे. ‘ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम’मध्ये बोलताना निलेकणी यांनी ही माहिती दिली. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
“प्रश्नांचा एक प्रचंड मोठा संग्रह आणि त्यामधून विशिष्ट दिवसासाठी प्रश्नपत्रिका अगदी ऐनवेळी तयार केल्यामुळे एखादी निश्चित प्रश्नपत्रिका असण्याचा मुद्दा उरत नाही. त्यामुळे ही समस्या सोडवण्याचा हा एक चांगला मार्ग असू शकतो”, असं मत निलेकणी यांनी व्यक्त केलं आहे.
एआयद्वारे प्रश्नपत्रिका तयार होणार?
परीक्षेच्या दिवशी एआयद्वारे (AI) प्रश्नपत्रिका तयार करता येऊ शकतात का? या प्रश्नावर बोलताना नंदन निलेकणी यांनी सांगितलं की, “हो, नक्कीच.” निलेकणी यांनी सर्व परीक्षांसाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीकडे वळण्याबाबतही भूमिका मांडली. ते म्हणाले की, “भारतात आधीच १,५०,००० अशी ठिकाणं उपलब्ध आहेत, जिथे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. मात्र, त्यासाठी नेटवर्कचा विस्तार करणं आवश्यक आहे.”
“दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व परीक्षा संगणक आधारित पद्धतीने कशा घेतल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी परीक्षा केंद्र आणि नेटवर्कची आवश्यकता आहे. आपल्याकडे १,५०,००० अशी ठिकाणं आहेत जिथे सर्वजण परीक्षा देऊ शकतात. आमची समिती या मुद्द्यांवरही लक्ष देत आहे. मला वाटतं की हे सर्व मुद्दे आहेत, ज्यावर समिती विचार करत आहे आणि याबाबतचे निर्णय अंमलात आणण्यासाठी पंतप्रधानही खूप उत्सुक आहेत”, असं नंदन निलेकणी यांनी म्हटलं आहे.
