दिवस उगवल्यावर जागे होणे आणि रात्री झोप येणे या क्रिया मानवासह बहुसंख्य प्राणिमात्रांमध्ये अनादि काळापासून चालू आहेत. आपल्या अनेक शरीरक्रिया त्यावर अवलंबून असतात. जीवशास्त्राच्या भाषेत त्याला ‘सरकॅडियन ऱ्हिदम’ किंवा ‘बॉडी क्लॉक’ (जैविक घडय़ाळ) असे म्हणतात. मात्र दररोज नित्यनेमाने ही क्रिया कशी चालते, याबाबत शास्त्रज्ञांना कायमच कुतूहल होते. प्राण्यांच्या शरीरात अशी कोणती कळ (स्वीच) आहे ज्यामुळे झोपणे आणि जागे होणे या क्रिया नियंत्रित होतात त्यावर अनेक वर्षे संशोधन सुरू होते आणि ही जैविक कळ शोधून काढण्यात एका भारतीय वंशाच्या अमेरिकी संशोधकाला यश मिळाले आहे.
रवी अल्लादा असे या संशोधकाचे नाव असून ते अमेरिकेच्या इलिनॉइस प्रांतातील नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठात जीवशास्त्राचे संशोधक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनेक वर्षे प्राण्यांच्या झोपेवर संशोधन केले आहे. त्यात फ्रुट फ्लायसारख्या साध्या रचनेचे आणि उंदरांसारख्या जटिल रचनेच्या प्राण्यांचा समावेश होता. जनुकीय रचनेत काही बदल झालेल्या माशांमध्ये झोपेचे नैसर्गिक चक्र बिघडलेले आढळून आले. त्यांचा अधिक अभ्यास केल्यावर लक्षात आले की मेंदूच्या चेतापेशींना ठरावीक वेळी झोपण्याचे आणि जागे होण्याचे संदेश पोहोचवले जातात. त्यात पेशींमधील सोडियम आणि पोटॅशियम चॅनेल्सची (वाहिन्या) भूमिका महत्त्वाची असते. दिवस उगवल्यावर या चेतापेशींच्या सोडियम चॅनेल्समध्ये अधिक क्रिया दिसून येते तर दिवस मावळताना पोटॅशियम चॅनेल्समधील प्रक्रियेत वाढ झालेली दिसून आली. यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की चेतापेशींमधील ही सोडियम आणि पोटॅशियम चॅनेल्स एखाद्या सायकलच्या पेडल्सप्रमाणे क्रमाक्रमाने प्राण्याचे झोपणे आणि जागे होणे नियंत्रित करतात.
रवी अल्लादा यांच्या मते जर उंदरांमध्ये ही प्रक्रिया अस्तित्वात आहे तर ती माणसांमध्येही असणार, कारण दोघांचीही शरीररचना बरीचशी सारखीच आहे. जर हा तर्क खरा ठरला तर माणसाला त्याच्या झोपणे आणि जागे होण्याच्या क्रियेची कळ हाती लागल्यासारखेच होईल. आज निद्रानाश आणि झोपेसंबंधी अन्य विकारांनी मानवी आरोग्यावर मोठा परिमाम होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये दिवस-रात्र पाळ्यांमध्ये (शिप्ट्स) काम केल्यानेही झोपेचे हे नैसर्गिक चक्र बिघडत आहे. अशा अनेक व्याधींवर या संशोधनातून उपाय शोधणे शक्य होईल.