Infosys is Monitoring Work Hours of Employees: सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी इन्फोसिसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी काम आणि खासगी आयुष्याचा ताळमेळ राखण्यासंदर्भात या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कंपनीच्या एचआरकडून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांची माहिती घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेतच काम आटपून घ्यावे, ओव्हर टाइम करू नये, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक तास काम केले, त्यांना ईमेलही पाठविण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.
इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी मागच्या वर्षी एका कार्यक्रमात बोलत असताना आठवड्याला ७० तास काम करायला हवे, असे म्हटले होते. कंपनीचा नवा उपक्रम हा मूर्ती यांच्या दृष्टीकोनाच्या अगदी उलट आहे. कोलकाता येथे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलत असताना मूर्ती म्हणाले की, जर देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तरूणांनी अधिक मेहनत करावी लागेल. जर तरूणच कठोर परिश्रम करणार नसतील तर मग कोण करणार?
मूर्ती यांनी १९८६ साली सरकारच्या पाच दिवसांच्या आठवड्याच्या प्रस्तावाचाही विरोध केला होता. ते म्हणाले की, या बदलांना माझा पाठिंबा नव्हता. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सीएनबीसी ग्लोबल लिडरशीप समिटमध्ये बोलत असताना ते म्हणाले की, मी वर्क लाइफ बॅलन्स ही संकल्पना मानत नाही. जर प्रगती साधायची असेल तर त्याग आणि अथक परिश्रमांची जोड द्यावीच लागते, असेही ते म्हणाले.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांच्या आठवड्यात दिवसाला ९.१५ तासांच्या वर काम केले आहे, त्या कर्मचाऱ्यांना प्रकृतीची काळजी घेण्याबाबतचा ईमेल कंपनीकडून पाठविण्यात येत आहे. या ईमेलमध्ये वर्क लाइफ बॅलन्स ठेवण्याबाबतही सांगण्यात आले आहे.
कंपनीकडून पाठविण्यात येणाऱ्या ईमेलमध्ये घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही सरासरी तास सांगण्यात येतात. निहित तासात काम संपवावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना खासगी आयुष्यासाठी तर वेळ देता येईलच त्याशिवाय दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीही त्याचा लाभ होतो, असेही या ईमेलमध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांनी अधेमधे कामातून ब्रेक घ्यावा, अधिक चिंता वाटल्यास थोडावेळ बाजूला होण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांच्या विधानावर चौफेर टीका झाली होती. सर्व वयोगटातील लोकांनी यावर आपापली मते मांडली होती. तसेच भारतात वाढत चाललेल्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी व्यक्त करण्यात आली.