अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून या घटनेबाबत विविध तर्क-वितर्क, खुलासे होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता यासंदर्भात नवी माहिती समोर येत आहे. नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येच्या तासभर आधी आपल्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नरेंद्र गिरी यांचे या व्हिडीओमधील आरोप हे त्यांच्या १३ पानी सुसाईड नोटमधील आरोपांशी मिळते-जुळते असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नरेंद्र गिरी यांचा हा व्हिडीओ एकूण ४ मिनिटं ३० सेकंदाचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र गिरी यांना सेल्फी मोडवर व्हिडिओ कसे रेकॉर्ड करायचे हे माहित नव्हतं. रविवारी (१९ सप्टेंबर) आत्महत्येच्या आदल्या दिवशी त्यांनी आपला एका विश्वासू शिष्य सर्वेश द्विवेदी याला बोलावून घेऊन सेल्फी व्हिडीओ कसा रेकॉर्ड करायचा हे शिकून घेतलं. मोबाईल फोन डेटानुसार नरेंद्र गिरी मुख्य व्हिडीओपूर्वी चाचणीकरिता काही व्हिडिओ रेकॉर्ड केले होते.

‘मॉर्फ्ड फोटोवरून मला ब्लॅकमेल केलं गेलं’, नरेंद्र गिरींच्या ‘सुसाईड नोट’मध्ये आरोप

नरेंद्र गिरी यांनी सोमवारी (२० सप्टेंबर) दुपारी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील आपल्या आश्रमात आत्महत्या केली होती. नरेंद्र गिरी यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या तपशीलानुसार, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आलं होतं. त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं. नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी ‘एका मुलीसोबतच्या मॉर्फ्ड फोटो’वरून त्यांना ब्लॅकमेल केलं होतं, असा खुलासा काहीच दिवसांपूर्वी करण्यात आला आहे.

सुसाईड नोटमधील आरोपांनंतर तिघांना अटक

नरेंद्र गिरी या व्हिडीओमध्ये देखील असं म्हणाले की, मला भीती वाटत होती की माझा शिष्य आनंद गिरी माझा एका महिलेसोबतचा मोर्फ केलेला फोटो व्हायरल करेल आणि मी अपमानित होईन. व्हिडीओप्रमाणेच नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये अलाहाबादमधील बाघांबरी मठाच्या पुजारी आध्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप यांचीही नाव लिहिण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर, या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आनंद गिरी यांच्यावर आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.