अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू हा षडयंत्राचा परिणाम असल्याचा आरोप हरिद्वारमधील साधू-संतांच्या समुदायाने केला आहे. नरेंद्र गिरी यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या तपशीलावरून असं दिसून आलं आहे की, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आलं होतं. कारण, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं. नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी ‘एका मुलीसोबतच्या मॉर्फ्ड फोटो’वरून त्यांना ब्लॅकमेल केलं होतं.

महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये अलाहाबादमधील बाघांबरी मठाच्या पुजारी आध्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप यांचीही नाव लिहिण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर, या तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आनंद गिरी यांच्यावर आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. अतिरिक्त डीजी (प्रयागराज झोन) प्रेम प्रकाश यांनी नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी १८ सदस्यीय एसआयटीची स्थापना केली आहे.

दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या प्रमुख लोकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत दोषींना सोडलं जाणार नाही.” तर अखिलेश यादव यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे चौकशीची मागणी केली आहे.

मॉर्फ्ड फोटोवरून ब्लॅकमेलिंग

“मला कळलं की आनंद गिरी हे माझा एका मुलीसोबतचा मॉर्फ्ड फोटो व्हायरल करणार होते. आनंदने मला सांगितलं की ‘एकदा हे पसरलं की, तुम्ही किती लोकांना तुमचं निर्दोषत्व सिद्ध कराल?’ मी आतापर्यंत माझं आयुष्य सन्मानाने जगलो आहे आणि भविष्यात मी ज्या अपमानाला सामोरे जाईन त्यानंतर त्या आरोपांसह मी जगू शकत नाही”, असं नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाशेजारी बाघांबरी मठात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

आत्महत्येमागे फक्त एक-दोन जण नाहीत!

नरेंद्र गिरी यांच्या शिष्यांसह हरिद्वारमधील साधूंनी आता असा आरोप केला आहे की, अखिल भारतीय आखाडा परिषद (एबीएपी) प्रमुख म्हणून घेतलेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांमुळे महंत नरेंद्र गिरी यांच्यावर नाराज असलेल्या लोकांच्या षडयंत्राचा हा परिणाम आहे. “नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येमागे फक्त एक किंवा दोन लोक असण्याची शक्यता नाही. २०१६ मध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे अनेकजण नाराज झाले होते”, असं एका साधूने सांगितलं आहे.