पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. मोदी आज ७१ वर्षांचे झाले. याचनिमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.

नक्की पाहा >> Birthday Special: सव्वा लाखांचं पेन, Apple गॅजेट्सबद्दलचं प्रेम अन् गॉगलची किंमत…; जाणून घ्या मोदींकडील महागड्या वस्तूंबद्दल

भाजपा तीन आठवडे मोदींचा वाढदिवस साजरा करणार आहे. मागील वर्षी भाजपाने पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहचे आयोजन केलं होतं. मात्र यंदा विस्तृत पद्धतीने हा कार्यक्रम आखण्यात आला असून त्याला सेवा आणि समर्पण अभियान असं नाव देण्यात आलंय. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांआधी येणाऱ्या मोदींच्या या वाढदिवसानिमित्ताने लसीकरणासंदर्भातील आकडेवारीचाही वापर सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी केला जाणार आहे. मोदींचा वाढदिवस असणाऱ्या आठवड्यामध्ये भारतामधील लसीकरण झालेल्यांची संख्या ७० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या कालावधीमध्ये पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये पक्षाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नक्की वाचा >> #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हॅशटॅग चर्चेत; मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘जुमला’दिवस’चीही चर्चा

सात ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पद अशी दोन महत्वाची पदं भूषवणारे मोदी सक्रीय राजकारणामध्ये २० वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळेच भाजपाने त्यांच्या वाढदिवसापासून ७ ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या कार्यक्रमासंदर्भातील निर्णय घेतल्याचं कळते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे महत्व, राष्ट्र आणि समाजाबद्दल असलेली समर्पणाची भावना जागृत करण्याचं काम केलं जाणार आहे. देशभरामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्व राज्यांमधील आणि जिल्ह्यांमधील भाजपाच्या मुख्य कार्यालयांमध्ये मोदींचे व्यक्तिमत्व आणि त्यांनी राबवलेल्या योजनांबद्दलची माहिती देणारं प्रदर्शन भरवलं जाणार आहे. भाजपा कोणकोणते कार्यक्रम घेणार आहेत पाहूयात यादी…

नक्की पाहा >> चला आपण सारे भारतीय पंतप्रधान मोदींनी गिफ्ट देऊयात आणि…; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट चर्चेत

> नमो अ‍ॅपवरुन व्हर्चूअल प्रदर्शन भरवण्यात येणार.

> पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना १४ कोटी रेशनच्या पिशव्यांचं वाटप करण्यात येणार. हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी वितरण केंद्रावर जाऊन सहभागी होतील.

> पक्षाचे कार्यकर्ते रक्तदान शिबिरांचे आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करतील

> पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रितनिधींना लसीकरण केंद्रांवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत.

> प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे.

> देशातील वेगवेगळ्या बागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पाच कोटी शुभेच्छापत्र पाठवली जाणार.

> २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कर्यक्रमांच्या यादीत एक विशेष कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलाय.

> गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

> नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरातील ७१ ठिकाणी नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.

> उत्तर प्रदेशमध्ये ७१ ठिकाणी गंगा स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे.

> अनाथ मुलांसाठी भाजपाकडून एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि महात्मा गांधींच्या जंयतीनिमित्ती विशे, कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

पक्षाने कार्यकर्त्यांना मोदींना भेट म्हणून मिळालेल्या गोष्टींचा लिलाव होणार असल्याचं सांगत यासंदर्भात माहिती लोकांना देण्यास सांगितलीय. तसेच भाजपाच्या किसान मोर्चाकडून मोदींचा वाढदिवस हा ‘किसान जवान सन्मान दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आलेत. या अंतर्गत सैनिक आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला जाणार आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या मोहिमांअंतर्गत आरोग्य, रक्तदान शिबिरांचं आयोजिन करण्याबरोबर गरीबांना रेशनवाटप करण्याचे निर्देश दिलेत.