लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या असून एका महिन्यापेक्षा कमी काळ राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासा असं आवाहन केलं आहे. नरेंद्र मोदींनी ब्लॉगच्या माध्यमातून जनतेला मतदार नोंदणी केली नसेल तर आजच करा असं सांगत आपलं एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये चार गोष्टींना प्राधान्य देण्यास सांगितलं आहे. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदणी, आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची तपासणी करणं, मतदानादिवशी इतर कोणताही प्लॅन न करणे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरणा देणं यांचा उल्लेख आहे.

नरेंद्र मोदींनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महिन्याभरापेक्षाही कमी काळ राहिला आहे. मतदान आपल्या महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. आपलं एक मत देशाच्या विकासासाठी महत्त्वाचं आहे. मतदान करत आपण देशाची स्वप्नं आणि अपेक्षा पूर्ण करण्यात आपलं योगदान देण्याचं काम करतो. आपण सर्वांनी एक असं वातावरण तयार करुयात जिथे मतदानपत्र मिळणं आणि मतदान करणं गर्वाची गोष्ट मानली जावी. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी तर हा सेलिब्रेशनचा दिवस असला पाहिजे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘आपण अशी परिस्थिती निर्माण करुयात जिथे मतदान न करणाऱ्याचा पश्चाताप झाला पाहिजे. यानंतर जेव्हा कधी देशात काही चुकीचं होईल तेव्हा ती व्यक्ती यासाठी स्वत:ला जबाबदार ठरवेल. आपण मतदान केलं असत तर अशी वाईट परिस्थती आज नसती असा विचार त्याच्या मनात आला पाहिजे’. असा पश्चात्ताप करावा लागू नये यासाठी मतदान करा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.

नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद पवार, मायावती यांच्यासह अनेक दिग्गज, तरुण नेते, अभिनेत्यांना टॅग करत लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्याचं आवाहन केलं आहे.