देशातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी आकाशवाणीच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे बराक ओबामा सहभागी होणार आहेत. खुद्द पंतप्रधानांनीच ट्विटरद्वारे ही घोषणा केली. २७ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न माझ्यापर्यंत पाठवा, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. या विशेष मन की बात कार्यक्रमाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, अशी ट्विप्पणी पंतप्रधानांनी केली आहे. यासाठीचे प्रश्न #अ२‘डुेंट्िर  या ट्विटर हँडलवर २५ तारखेपर्यंत पाठवा किंवा मायगव्ह या संकेतस्थळावरही तुम्ही मनातील प्रश्न विचारा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
तसेच देशातील नागरिकांनी ही संधी चुकवू नये, असे आवाहनही मोदींनी केले आहे.
उभयपक्षी जिव्हाळ्याचे प्रतीक
अध्यक्ष बराक ओबामा यांचा आगामी भारत दौरा हा द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून भारताविषयी अमेरिकेला असलेल्या जिव्हाळ्याची ग्वाही या दौऱ्यातून जगाला देण्याची आमची इच्छा आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार बेन ऱ्होडस् यांनी सांगितले. अध्यक्ष ओबामा आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ‘केमिस्ट्री’ नक्की जुळेल आणि त्यातून द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर जाण्यास मदत होईल, असा आशावादही ऱ्होडस् यांनी व्यक्त केला. या भेटीच्या आमंत्रणाने आमच्याही भुवया उंचावल्या होत्या अशी प्रांजळ कबुलीही ऱ्होडस् यांनी दिली. मात्र त्याचवेळी, या भेटीमुळे दोन्ही देशांतील नेत्याबरोबरच लोकही मनाने अधिक जवळ येतील, असे ते म्हणाले.