नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर सोमवारी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन झाले असून बंगालच्या जनतेचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. पश्चिम बंगाल भयमुक्त झाला असून तो ‘विकासयुक्त’ होईल, अशी ग्वाही दिली.
पश्चिम बंगालची वाटचाल आता भविष्याकडे होणार आहे. जिथे विकास, अढळ विश्वास आणि नव्या आशा हातात हात घालून पुढे जातील. पश्चिम बंगालचे भविष्य घडवण्यासाठी भाजप अहोरात्र काम करेल, असे आश्वासनही मोदींनी दिले. प्रशासकीय प्राधान्यक्रमांवर भर देत मोदींनी, महिलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण आणि तरुणांसाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्याचे वचन दिले.
आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे राज्यातून होणारे स्थलांतर रोखले जाईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. भाजपच्या नव्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘आयुष्मान भारत’ योजनेला मंजुरी दिली जाईल. पश्चिम बंगालच्या जनतेला या योजनेपासून वंचित ठेवले गेले होते. त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल, आरोग्यसेवेची व्याप्ती अधिक वाढेल, अशी घोषणाही मोदींनी केली.
पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासाकडे वाटचाल करू लागला आहे. बंगालमध्ये परिवर्तन झाले आहे. राज्याच्या राजकारणात झालेला हा निर्णायक बदल असल्याचे मोदींनी अधोरेखित केले. राज्यात रचनात्मक राजकीय वातावरण निर्माण केले जाईल. सूडासाठी नव्हे तर बदलासाठी काम करण्याचे आवाहन मोदींनी राजकीय पक्षांना केले. तसेच, भीती निर्माण करणे, लोकामध्ये फूट पाडण्यापेक्षा पश्चिम बंगालच्या विकासाला व उज्ज्वल भविष्याला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे मोदी म्हणाले.
मोदींनी केंद्रीय निवडणूक आयोगासह त्यांच्या कर्मचार्यांचे कौतुक केले. भारताच्या लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित राखण्यात तुम्ही दिलेल्या योगदानाची नोंद इतिहास कायमस्वरूपी घेईल, असे मोदी म्हणाले. मोदींनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधताना आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून लक्षणीय ‘सांस्कृतिक विधान’ केले. राजकीय संदेश देण्यासाठी कपड्यांचा उचित वापर करण्याकरता ओळखल्या जाणार्या मोदींनी पांढरा कुर्ता (पंजाबी) आणि लाल काठाची रेशमी धोती असा पारंपरिक बंगाली पोशाख परिधान केला होता.
पारंपरिक बंगाली पोशाख
मोदींनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधताना आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून लक्षणीय ‘सांस्कृतिक विधान’ केले. राजकीय संदेश देण्यासाठी कपड्यांचा उचित वापर करण्याकरता ओळखल्या जाणार्या मोदींनी पांढरा कुर्ता (पंजाबी) आणि लाल काठाची रेशमी धोती असा पारंपरिक बंगाली पोशाख परिधान केला होता.
मी निवडणूक आयोग, त्यांचे कर्मचारी, निवडणुकीच्या काळात काम करणारे इतर लोक आणि सुरक्षा कर्मचारी यांचे आभार मानतो. लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित राखण्यात तुम्ही दिलेल्या योगदानाची नोंद इतिहास कायमस्वरूपी घेईल. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान
