पीटीआय, नवी दिल्ली
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या काळातील संथ आर्थिक विकासाला धूर्तपणे ‘हिंदू विकास दर’ असे नाव देण्यात आले. वास्तविक, तो ‘काँग्रेस विकास दर’ होता, कारण त्या काळात देशात शासन, धोरण आणि निर्णयक्षमतेचा पूर्ण अभाव होता, असा घणाघात मोदी यांनी केला. त्याच वेळी, २०१४ पासूनच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशाला काँग्रेसच्या ‘दुष्टचक्रातून’ मुक्त केल्याचा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीत बोलताना मोदी यांनी देशातील जनतेने राजकीय स्थैर्य आणि निर्णायक नेतृत्वाचे महत्त्व ओळखल्याचे सांगितले. याच दिवशी त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ४,३९८ दिवसांच्या विक्रमाला मागे टाकत सलग निवडून आलेले सर्वाधिक काळ कार्यरत पंतप्रधान होण्याचा मान मिळवला.
मोदी यांच्या गौरवार्थ रालोआने विशेष ठराव मंजूर केला. या ठरावात मोदी यांच्या ‘दूरदर्शी नेतृत्वा’चे आणि ‘अखंड लोकसेवे’चे कौतुक करण्यात आले. ठराव स्वीकारताना मोदी म्हणाले, ‘हा माझा वैयक्तिक सन्मान नसून रालोआ परिवारातील सर्व घटक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे.’
जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव
मोदी यांनी विक्रम प्रस्थापित केल्यानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी अभिनंदनपत्र पाठविले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग टोबगे यांच्यासह अनेक नेत्यांनी समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपतींपासून नितीशकुमारांपर्यंत गौरव
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी यांना वैयक्तिक पत्र पाठविले. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संयुक्त जनता दलाचे सर्वेर्सा नितीशकुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. केंद्रीय मंत्रिमंडळानेही विशेष ठराव मंजूर करून मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले. बैठकीच्या सुरुवातीला मंत्रिमंडळातील सहकार्यांनी उभे राहून पंतप्रधानांचा विशेष सन्मान केला.
काँग्रेसची टीका
विरोधकांनी मात्र यावरून मोदींवर टीका केली आहे. मोदींच्या काळात लोकशाहीचा खून होत आहे असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळात जगातील सर्वोत्तम नेत्यांचा समावेश होता, ज्याची तुलना मोदींशी होऊ शकत नाही असे रमेश यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ संथगतीला हिंदूंचे नाव का?
काँग्रेसच्या काळातील अपयशावर बोट ठेवताना मोदी म्हणाले की, भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसचे अपयश लपवण्यासाठी ‘हिंदू विकास दर’ ही संज्ञा वापरून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला.
