अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून, सायंकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, भाजपाने स्वःपक्षातील नेत्यांसह मित्र पक्षातील काही नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं आहे. त्यामुळे दिल्लीत दाखल झालेल्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे निश्चित मानलं जात आहे. यात महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश आहे. भाजपाचे नेते नारायण राणे यांचं नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होतं. त्यांनाही दिल्लीत बोलावलं असून, ते मंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तसेच त्यांच्याकडे देण्यात येणाऱ्या खातंही निश्चित झालं असल्याचंही वृत्त आहे.
नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी हे मंत्रीपद शिवसेनेकडे होतं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यापासून शिवसेनेला हे मंत्रिपद देण्यात आलं होतं. मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचं काम बघितलं. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योगमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर अरविंद सावंत यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे. आता नारायण राणे यांच्याकडे अवजड उद्योग खात्याची सूत्रं दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेबरोबरच भाजपाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.




हेही वाचा- मोदी सरकारने स्थापन केले नवीन मंत्रालय; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी घेतला निर्णय
यांची लागू शकते मंत्रिमंडळात वर्णी?
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होत असताना त्यात समाविष्ट केल्या जाणाऱ्या काही नेत्यांची चर्चा होत आहे. यात नारायण राणे, नंदुरबारच्या खासदार हिना गावित, माढाचे खासदार रणजीत नाईक-निंबाळकर व राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांच्याही नावाची चर्चा होत आहे. त्याचबरोबर आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे, ‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस, जनता दलाचे (संयुक्त) लल्लन सिंह व आरसीपी सिंह, भाजपाच्या रिटा बहुगुणा-जोशी, पंकज चौधरी, रामेश्वर कथेरिया, वरुण गांधी, सी. पी. जोशी, राहुल कासवान तसेच ‘अपना दला’च्या अनुप्रिया पटेल आदींच्या नावाची चर्चा आहे. हे नेतेही मंगळवारी राजधानीत दाखल झाले.
संबंधित वृत्त- Modi Cabinet Reshuffle : राणे, कपिल पाटील यांची केंद्रात वर्णी?
या नेत्यांशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे समजते. काँग्रेसमधून नुकतेच भाजपामध्ये गेलेले जितीन प्रसाद तसेच, तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे दिनेश त्रिवेदी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. सायंकाळी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे स्पष्ट होणार आहे.