PM Modi Speaks With Saudi Crown Prince : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला जवळपास चार आठवड्यांचा कालावधी होऊन गेला आहे. अजूनही हे युद्ध पूर्णपणे संपलेलं नाही. मात्र, आता हे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या युद्धाच्या झळा जगातील अनेक देशांना बसल्या आहेत. या युद्धामुळे आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत.
एवढंच नाही तर जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीमध्येही तणाव असल्यामुळे जागतिक व्यापाराला अडचणी निर्माण होत आहेत. याचा फटका भारतासह जगातील अनेक देशांना बसत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये काही व्यापारी जहांजारवरही हल्ल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती राष्ट्रांत निर्माण झालेला तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीमधील तणावामुळे जागतिक व्यापाराला निर्माण झालेल्या अडचणी अशा विविध विषयांच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज प्रिन्स महंमद बिन सलमान यांच्याशी फोनवरून संवाद साधत सविस्तर चर्चा केली.
यावेळी जलवाहतुकीचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याची गरज आणि सागरी व्यापारी मार्ग खुले व सुरक्षित ठेवण्याच्या आवश्यकतेवर चर्चा झाली असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटलं?
“सौदी अरेबियाचे युवराज प्रिन्स महंमद बिन सलमान यांच्याशी संवाद साधला आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. प्रादेशिक ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा भारताकडून होणारा निषेध मी पुन्हा एकदा व्यक्त केला. तसेच जलवाहतुकीचं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्याची गरज आणि सागरी व्यापारी मार्ग खुले व सुरक्षित ठेवण्याच्या आवश्यकतेवर आम्ही दोघेही सहमत झालो. सौदी अरेबियातील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले आहेत”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
इराणचा आखाती राष्ट्रांना पुन्हा मोठा इशारा
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसला. जवळपास चार आठवड्यांपासून हे युद्ध सुरू आहे. आता हे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणसमोर १५ कलमी शांतता प्रस्ताव ठेवला होता. पण अमेरिकेने दिलेला प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे.
युद्ध थांबवण्यासाठी वाटाघाटींवर चर्चा सुरू आहेत. मात्र, यातच इराणने आखाती राष्ट्रांना पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आखाती राष्ट्रांबाबत एक महत्वाचं भाष्य केलं आहे. मसूद पेझेश्कियान म्हणाले की, “आम्ही वारंवार सांगितलं आहे की इराण पूर्वनियोजित हल्ले कधीही करत नाही. जर आमच्या पायाभूत सुविधा किंवा आर्थिक केंद्रांना लक्ष्य केलं गेलं तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. तसेच या प्रदेशातील देशांनो, जर तुम्हाला विकास आणि सुरक्षा हवी असेल तर आमच्या शत्रूंना तुमच्या भूमीवरून युद्ध करू देऊ नका”, असा इशारा इराणचे अध्यक्ष डॉ.मसूद पेझेश्कियान यांनी दिला.
