पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळातील गरीब मंत्र्यांमध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील पंतप्रधान मोदी यांच्या संपत्ती आणि कर्जाचा तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या तपशीलानुसार मोदी यांनी स्वत: आणि त्यांच्यावर लिहण्यात आलेल्या पुस्तकांच्या रॉयल्टीपोटी मोदींना १२.३५ लाख इतकी रक्कम मिळते. याशिवाय, गेल्यावर्षीच्या तुलनेत मोदींकडे असणाऱ्या रोख रक्कमेतही वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ही रक्कम केवळ ४,५०० इतकी होती. आता हा आकडा ८९,७०० वर जाऊन पोहचला आहे. मात्र, इतके असूनही मंत्रिमंडळाचा विचार करायचा झाल्यास मोदी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांपेक्षा गरीब असल्याचे दिसत आहे.
मोदी सरकारमधील ७२ मंत्री कोट्याधीश तर २४ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
गुजरातच्या गांधीनगर येथील बँकेच्या बचत खात्यात नरेंद्र मोदींच्या नावे २.१० लाखांची रक्कम आहे. याशिवाय, त्यांच्या नावे ५० लाखांची मुदत ठेवही आहे. दरम्यान, मोदींकडे असलेल्या सोन्याच्या वस्तूंमध्ये कोणतीही भर पडली नाही. त्यांच्याकडे १.२७ लाखांच्या सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. मात्र, यंदाच्यावर्षी पुस्तकांच्या रॉयल्टीपोटी मिळणाऱ्या पैशांमुळे मोदींच्या जंगम मालमत्तेत वाढ होऊन ही रक्कम ७३.३६ लाख इतकी झाली आहे. मोदींच्या स्थावर मालमत्तेत त्यांच्या गांधीनगर येथील एकमेव घराचा समावेश आहे. या घराची किंमत १ कोटी इतकी आहे.  पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर करणाऱ्यांमध्ये सदानंद गौडा, रामविलास पासवान, मेनका गांधी आणि प्रकाश जावेडकर या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
3-modi modi-4 modi-11 modi-21