निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ‘अच्छे दिन’ आणण्यास भाजपचे सरकार असमर्थ ठरले असून आपले अपयश झाकण्यासाठी सरकार आता विविध कारणे शोधत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याने महागाई वाढत असल्याबद्दल काँग्रेसने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही टीका केली आहे.
सरकारच्या भ्रष्टाचारामुळे महागाई वाढत आहे, असा आरोप भाजप विरोधी पक्षात असताना करीत होता. मात्र आता भाजप सत्तेत असतानाही त्यांची हीच भावना आहे का, असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी केला आहे. वाढत्या महागाईला साठेबाजी कारणीभूत असल्याने राज्य सरकारांनी साठेबाजांवर वचक ठेवला पाहिजे, असे मत जेटली यांनी व्यक्त केले आहे. जनतेने आता काही कटू निर्णय पचविण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबरच जेटली यांच्या विधानाकडे पाहिले जात आहे. देशातील जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविणाऱ्या भाजपला जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयश आले असून ते झाकण्यासाठी आता विविध कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. साठेबाजी, राज्य सरकारांची कामगिरी आदी बाबी महागाईस कारणीभूत असल्याचे आम्ही सांगितले तेव्हा विरोधी पक्ष म्हणून भाजपने आमच्यावर चौफेर टीका केली होती, असेही माकन म्हणाले.