PM Modi Letter After 45 Hours Meditation: २०६ सभा, रोड शो, ८० हून अधिक मुलाखती व ‘अबकी बार ४०० पार’च्या घोषणांसह प्रचाराचं झंझावाती वादळ देशभरात पोहोचवल्यावर मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला पोहोचले होते. कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये मोदींनी तब्बल ४५ तास ध्यानधारणा केली. १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान केल्यावर मग ते दिल्लीला रवाना झाले आहेत. यादरम्यान मोदींनी संपूर्ण मौन बाळगून केवळ नारळ पाणी, द्राक्षांचा रस व तत्सम आहार घेतल्याची माहिती इंडिया टुडेने दिली होती. या एकूण अनुभवाविषयी सांगताना मोदींनी स्वहस्ते एक पत्र लिहिले आहे. भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी हे पत्र आपल्या सोशल मीडियावर शेअर सुद्धा केलं आहे. मोदींच्या ४५ तासांच्या ध्यानधारणेत नेमकं त्यांनी काय अनुभवलं हे जाणून घेण्यासाठी आपणही आता या पत्रावर एक नजर टाकूया..

“भारताच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी येथील ‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ला भेट देताना मला एक दैवी ऊर्जा जाणवली . याच खडकावर माता पार्वती आणि स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते. पुढे एकनाथ रानडे यांनी या खडकाचे रूपांतर ‘शिला स्मारक’मध्ये केले ज्याने स्वामी विवेकानंदांचे विचार पुनर्जिवित केले. आध्यात्मिक पुनर्जागरणाचे नेते स्वामी विवेकानंद हे माझे आदर्श, माझी उर्जा आणि माझ्या अध्यात्माचे स्रोत आहेत.

अनेक वर्षांपूर्वी, संपूर्ण देशाचा प्रवास केल्यानंतर, जेव्हा स्वामी विवेकानंदांनी येथे ध्यान केले, तेव्हाच त्यांनी भारताच्या पुनरुत्थानासाठी नवीन दिशा व संकल्पनांविषयी विचार केला. हे माझे भाग्य आहे की आज इतक्या वर्षांनंतर भारताने स्वामी विवेकानंदांच्या मूल्यांना आणि आदर्शांना मूर्त रूप दिल्याने मलाही या पवित्र ठिकाणी ध्यान करण्याची संधी मिळाली आहे.

‘शिला स्मारक’ येथे ध्यानसाधना हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. ‘मा भारती’च्या चरणी बसून मी पुन्हा एकदा माझ्या संकल्पाचे स्मरण करतो की माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि माझ्या शरीराचा प्रत्येक कण राष्ट्रसेवेसाठी समर्पित राहील. देशाच्या प्रगतीसाठी आणि तेथील नागरिकांच्या कल्याणाच्या शुभेच्छांसह, मी ‘मा भारती’ला अत्यंत नम्रभावे अभिवादन करतो. “

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान यापूर्वी २०१९ सालीही प्रचार संपल्यानंतर ध्यानधारणा करण्यासाठी उत्तराखंडची निवड केली होती. शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रुद्र गुहेत ध्यानस्थ झाले होते. २०२४ च्या निवडणुकीच्या नंतर त्यांनी कन्याकुमारीची निवड केली होती.