नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या क्नेसेटमध्ये केलेले भाषण म्हणजे तेथील यजमान बिन्यामिन नेतान्याहू यांची निर्लज्जपणे केलेली पाठराखण आहे आणि त्यामुळे भारताची नैतिक प्रतिष्ठा कमी झाली आहे,’ अशा शब्दांत काँग्रेसने गुरुवारी पंतप्रधानांवर टीका केली. विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जुलै १९४७ मध्ये इस्रायलच्या निर्मितीवर भाष्य केले होते. त्याचा दाखला काँग्रेसने दिला.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा निषेध केला. भारताने इस्रायलला निर्मितीवेळीच मान्यता दिल्याचे रमेश म्हणाले. नेहरूंनी लिहिलेल्या पत्राचा दाखला त्यांनी दिला. नेहरूंनी आइनस्टाइन यांना ११ जुलै १९४७ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘ज्यू समुदायाबद्दल मला खूप सहानुभूति आहे. पण, अरबांच्या दुर्दशेबद्दलही मला सहानुभूति आहे. हा मुद्दा दोन्ही बाजूंनी अतिशय भावनिक आता झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रगल्भ नेते जोपर्यंत पुढाकार घेत नाहीत, तोपर्यंत मला या समस्येवर कुठलाही उपाय दिसत नाही.’
नेहरू पुढे पत्रात म्हणतात, ‘पॅलेस्टाईनमध्ये ज्यू व्यक्तींनी खूप चांगले काम केले आहे. तेथील लोकांचे जीवनमान उंचावले आहे. पण, एक बाब मला या ठिकाणी खटकते. इतकी उपलब्धी असूनही, अरबांच्या सदिच्छा मिळण्यात ते कमी का पडले? अरबांनी त्यांच्या मागण्या त्यांच्या इच्छेविरोधात सोडून द्याव्यात, असे त्यांना का वाटते?’

