शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी हस्तांदोलन केले. परिषदेस उपस्थित असलेल्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेनंतर दोन्ही नेत्यांनी केलेल्या हस्तांदोलनास तणावपूर्ण संबंधांच्या पाश्र्वभूमीवर महत्त्व दिले जात आहे. क्षी जिनपिंग यांनी पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. मोदी व हुसेन हे १८ व्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या  बैठकीनिमित्ताने पत्रकार परिषदेस उपस्थित होते. पाकिस्तान व भारत यांनी पूर्ण सदस्य म्हणून यात भाग घेतला.

भारत व पाकिस्तान या देशांचे संबंध २०१६ मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील उरी क्षेत्रात केलेल्या हल्ल्यानंतर बिघडत गेले. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर म्हणून पाकिस्तानने अटक केली होती. उरी येथील हल्ल्यानंतर भारताने १९ व्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला होता. बांगलादेश, भूतान व अफगाणिस्तान यांनीही सहभागातून माघार घेतल्याने सार्क परिषद रद्द करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती उत्तरोत्तर बिघडत चालली आहे. भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा यापूर्वी अनेक मंचावर मांडला असून पाकिस्तानने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत अशी मागणी केली आहे. मोदी यांनी एससीओ बैठकीच्या निमित्ताने अनेक द्विपक्षीय चर्चा केल्या असून मोदी व हुसेन यांच्यात मात्र द्विपक्षीय बैठक झाली नाही. मोदी यांनी सांगितले, की अफगाणिस्तानातील दहशतवादाचे आव्हान  व त्याचे परिणाम मोठे आहेत. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी जुलैनंतर जे सरकार येईल ते आर्थिक स्थिरता निर्माण करील. चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका प्रकल्प हा बीआरआयचा भाग असून त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला उत्तेजन मिळणार आहे. भारताचा मात्र ही मार्गिका पाकव्याप्त काश्मीरला जात असल्याने विरोध आहे.