गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी ज्या भाषेचा वापर करीत आहेत ती भाषा पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला साजेशी नाही, त्यामुळे मोदी यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्याकडून भाषेच्या वापराचे धडे गिरवावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी त्यांना दिला आहे.
आपल्या निवडणुकीच्या जाहीर सभेतून मोदी ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत ती भाषा नगरसेवकाच्या पातळीवरील असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांनी स्वराज आणि जेटली यांच्याकडून धडे गिरवावे, असे शुक्ला म्हणाले.
सागर येथे भाषण करताना मोदी यांनी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना चावणाऱ्या डासांचे आभार मानले. पंतप्रधानपदाच्या उमेदवाराकडून अशा प्रकारच्या भाषेचा वापर अपेक्षित नाही. एखाद्या व्यक्तीवर हल्ला चढविण्यासाठी अयोग्य भाषेचा वापर करणेच गरजेचे नसते, सभ्य भाषेचा वापर करूनही हल्ला चढविता येतो, असेही शुक्ला म्हणाले.