लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मतदारसंघात, अर्थात वाराणसीमध्ये दौरा केला. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेच्या १७व्या हप्त्यासाठीचे तब्बल २० हजार कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे देशभरात या योजनेशी निगडीत तब्बल ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये जमा झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये आज पीएम किसान योजनेसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. खुद्द पंतप्रधानांनी ही घोषणा केली असून त्यानुसार पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीचा १७वा हप्ता जारी करण्यात आला आहे. या योजनेनुसार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात थेट प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले. आज तब्बल ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली. त्यामुळे ती तब्बल २० हजार कोटींच्या घरात जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०१९ साली या योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दर वर्षाला ६ हजार रुपये जमा करेल. हे पैसे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता अशा पद्धतीने वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये जमा केले जाणार आहेत.

बचत गटाच्या महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप

दरम्यान, पीएम किसान योजनेचा निधी जारी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला बचत गटातील तब्बल ३० हजार महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं.

“निवडणुका जिंकल्यानंतर आज मी पहिल्यांदा वाराणसीत आलो आहे. भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये देशाच्या ६४ कोटींहून जास्त लोकांनी मतदान केलं आहे. पूर्ण जगात याहून मोठ्या निवडणुका कुठे होत नाहीत जिथे इतक्या मोठ्या संख्येनं लोक मतदानात सहभाग घेता. मी जी ७ च्या परिषदेसाठी इटलीला गेलो होतो. जी ७ च्या सर्व देशांच्या सर्व मतदारांना एकत्र केलं तरी भारतातल्या मतदारांची संख्या त्यांच्यापेक्षा दीडपट जास्त आहे. युरोपियन युनियनच्या सर्व मतदारांना एकत्र केलं तरी भारतीय मतदारांची संख्या त्यांच्यापेक्षा अडीचपट जास्त आहे. या निवडणुकीत ३१ कोटींहून जास्त महिलांनी सहभाग घेतला आहे. एका देशात महिला मतदारांनी सहभाग घेतल्याबाबत जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेच्या जवळपास पूर्ण लोकसंख्येइतकं हे प्रमाण आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“सरकार स्थापन होताच शेतकरी व गरिबांशी निगडीत निर्णय घेण्यात आला. गरीबांसाठी ३ कोटी नवी घरं, पीएम किसान निधी जारी करणं हे निर्णय कोट्यवधी भारतीयांची मदत करतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.