ईशान्य भारताचा विकास करण्यात काँग्रेस अपयशी ठरल्याची टीका
राज्यसभेत गेल्या २३ वर्षांपासून आसामचे प्रतिनिधित्व दस्तुरखुद्द पंतप्रधान डॉ़  मनमोहन सिंग करीत असूनही ईशान्य भारताचा विकास करण्यात त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शासन अपयशी ठरले आह़े  असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केला़  आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण भारतात प्रचारसभांनी दणाणून सोडणाऱ्या मोदींनी आता ईशान्य भारताकडेही आपले लक्ष वळविल्याचे या निमित्ताने दिसून आल़े  
 तुम्ही निवडून पाठविलेला प्रतिनिधी तुमच्यासाठी काही करू शकत नसेल, तर तो देशाचे काय भले करणार, असा खोचक प्रश्नही मोदींनी या वेळी केला़  गुवाहाटी आणि इम्फाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या निवडणूक प्रचार सभेत मार्गदर्शन करताना मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली़  एखाद्या सामान्य कामगाराने जरी इतकी वष्रे सलग एखाद्या राज्याचे प्रतिनिधित्व केले असते, तर त्यानेसुद्धा या राज्याचा चेहरामोहरा बदलला असता़  पण मनमोहन सिंग ते करू शकले नाहीत़  राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री केवळ कोनशिला रोवण्याच्या आणि फिती कापण्याच्या कार्यक्रमांनाच मनमोहन सिंग यांना पाचारण करतात़  मात्र त्यानंतर पुढे काहीच होत नाही़  राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात ईशान्य भारताच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली होती़  काँग्रेस शासन मात्र केवळ भ्रष्टाचार करण्यातच गुंतलेले आहे, असा बोचरी टीकाही त्यांनी केली़

‘निदोचा मृत्यू
देशासाठी लज्जास्पद’
अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थी निदो तानिया याचा दिल्लीत झालेला मृत्यू ही देशासाठी शरमेची बाब असल्याचे सांगत मारहाणीत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांला मोदी यांनी या वेळी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. योग्य प्रशासनाचा अभाव आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढत चालली असल्याचे मोदी म्हणाल़े

केरळ दौऱ्यात मोदींची चर्च प्रतिनिधींशी भेट?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांची केरळमध्ये पहिलीच जाहीर सभा होणार असून ते कोचीमध्ये विविध चर्चमधील प्रतिनिधींशी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे एका अग्रगण्य दलित संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीलाही ते संबोधित करण्याची शक्यता आहे.