पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कागरील येथे जाऊन देशाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. येथे त्यांनी सैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, विकास, सीमा सुरक्षा, भारताचे सामर्थ्य अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. दरम्यान, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याबद्दल बोलताना आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मात्र शांती ही सामर्थ्याशिवाय शक्य होत नाही. कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्य त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> भारतीय जवान हेच माझं कुटुंब, यापेक्षा गोड दिवाळी असू शकत नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्यासाठी युद्ध हा कधीच पहिला पर्याय नाही. आपल्या वीरतेमुळे, संस्कारामुळे आपण युद्धाला नेहमीच शेटचा पर्याय समजलेले आहे. लंका किंवा कुरुक्षेत्र असो, येथे आपण नेहमीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आपण विश्वशांतीचे पुरस्कर्ते आहोत. आपण युद्धविरोधी आहोत. मात्र शांततेसाठीही सामर्थ्य लागते. आपल्या सैनिकांकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे. कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या तिन्ही दलाचे सैन्य उत्तर देण्यास समर्थ आहे. शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तद देण्यास आपले सैन्य समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान? फक्त एक पाऊल दूर; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

तुमच्या (सैनिक) शौर्यासमोर आकाशदेखील झुकतो. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचे प्रतिक आहे. शिखरावर बसलेला शत्रूदेखील भारतीय सेनेच्या साहसासमोर छोटा होतो. तुम्ही (सैनिक) सीमेचे रक्षक असून देशाचे महत्त्वाचे स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातील लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते, अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासने ओतप्रोत असते तेव्हाच देश सुरक्षित असतो. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांची स्तुती केली.