Narendra Modi Ayodhya Ram Mandir Flag Hoisting : अयोध्येतील राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२५ नोव्हेंबर) मंदिरावर ध्वजारोहण केलं. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढणं आवश्यक आहे. पुढील १० वर्षांत आपण भारतीय जनतेला गुलामगिरीच्या मानिसकतेतून बाहेर काढलं तर २०४७ पर्यंत भारत विकसित झालेला दिसेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भगवान बसवण्णांच्या अनुभवमंटपची (१२ व्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केलेलं ऐतिहासिक, सामाजिक-धार्मिक व्यासपीठ) माहिती मर्यादित ठेवली गेली. तिथे सामाजिक, धार्मिक व आर्थिक विषयांवर चर्चा होत होती. सामूहिक सहमतीने निर्णय घेतले जात होते. परंतु, गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे भारताच्या कित्येक पिढ्या अनुभवमंडपबाबत अनभिज्ञ राहिल्या. देशाच्या व्यवस्थेमध्ये, कानाकोपऱ्यात गुलामगिरीची मानसिकता ठाण मांडून बसली होती.”
आम्ही भारतीय नौदलाचा झेंडा बदलला : मोदी
मोदी म्हणाले, तुम्ही काही दिवस मागे जाऊन पाहा, भारतीय नौदलाचा झेंडा आठवून पाहा. अनेक दशकं त्या झेंड्यावर अशी काही प्रतीकं होती जिचा आपल्याशी, भारतीय सभ्यतेशी आणि आपल्या वारशाशी काडीमात्र संबंध नव्हता. आम्ही नौदलाच्या झेंड्यावरील गुलामीची ती सगळी प्रतीकं हटवली आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा स्थापित केला. तो केवळ डिझाईनमधला बदल नव्हे, तो इथल्या लोकांची मानसिकता बदलण्याचा क्षण होता. आपण इतके समृद्ध असताना इतरांचा वारसा कशाला हवा?”
देशात परिवर्तन घडू लागलं आहे : पंतप्रधान
देशात आता परिवर्तन घडू लागलं आहे. गुलामीची मानसिकता, जिने आमच्या रामत्वाला नाकारलं ती आता बाजूला होतेय. भगवान श्रीराम ही एक मूल्य प्रणाली आहे. भारताच्या प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि कणाकणात राम आहे. पूर्वी गुलामीच्या मानसिकतेने आपल्याला वेढलं होतं, त्यामुळेच आपल्यापैकी काहीजण प्रभू श्रीरामाला काल्पनिक घोषित करून मोकळे झाले होते.
“…तर आपण २०४७ पर्यंत विकसित देश म्हणून गणले जाऊ”
पंतप्रधान म्हणाले, “आपण आत्ता ठरवलं तर पुढच्या १० वर्षांमध्ये मानसिक गुलामीपासून मुक्ती मिळवू शकतो. तसं झाल्यास अशी अग्नी प्रज्वलित होईल, भारतीयांचा आत्मविश्वास इतका वाढेल की २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होईल. आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. केवळ १० वर्षांमध्ये आपल्याला गुलामीच्या बेड्या तोडाव्या लागतील.
