केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाण साधला आहे. शरद पवार यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याचे धाडस केल्याबद्दल नरेंद्र मोदींना भारतरत्त्न मिळायला हवा, असा खोचक टोला केजरीवाल यांनी ट्विटरवरून लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी बारामती येथे झालेल्या सभेत ‘एनसीपी’चा उल्लेख ‘नॅचरल करप्ट पार्टी’ असा केला होता. याशिवाय, बारामतीकरांना काका-पुतण्यांची भ्रष्ट राजवट उलथवून टाकण्याचे आवाहनही केले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात आश्चर्यकारकरित्या मधूर संबंध तयार झाले होते. मोदी आणि पवार यांची ही मैत्री कायमच चर्चेचा विषय ठरली आहे. याच मुद्द्यावर बोट ठेवत केजरीवाल यांनी गुरूवारी ट्विटरवरून मोदींना लक्ष्य केले. आपच्या अनेक नेत्यांनी आणि समर्थकांनीही केजरीवालांचा मुद्दा उचलून धरत मोदी सरकारचा दुटप्पीपणा उघड करणारे संदेश ट्विटस केले आहेत. देशातील भ्रष्टाचार निर्मुलन राजकारणासाठी खरतरं पवारांना पद्मविभूषण नव्हे तर भारतरत्न मिळायला हवा. #अबकी बार शरद पवार , असे खोचक ट्विट केजरीवालांनी रिट्विट केले आहे.