Narendra Modi Visits Chief Justice DY Chandrachud House for Ganeshotsav : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मोदींनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतले व बाप्पाची आरती देखील केली. पंतप्रधानांच्या या कृतीनंतर सरन्यायाधीशांवर व मोदींवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली. ही भेट घटनाबाह्य असल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच अनेक घटनातज्ज्ञांनी देखील मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक होती असं म्हटलं होतं. देशाच्या लोकशाहीसाठी हे चांगलं चित्र नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, या सर्व टीकेवर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं. मोदी म्हणाले, “ते लोक फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा तसाच प्रयत्न चालू आहे. गणेश पूजेवर त्यांचा आक्षेप आहे”. ओडिशामधील विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मोदी यांनी या सगळ्या घटनांवर व विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी मोदी म्हणाले, “गणेशोत्सव आमच्यासाठी केवळ आस्थेचा विषय नाही”.

हे ही वाचा >> “ज्यांनी बुलडोझरच आपलं चिन्ह बनवलं होतं, त्यांच्यासाठी…”, सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर अखिलेश यादवांची खोचक टिप्पणी!

मोदींकडून काँग्रेसची इंग्रजांशी तुलना

मोदी म्हणाले, गणेशोत्सव आमच्यासाठी केवळ आस्थेचा विषय नाही किंवा नुसता सण नाही. गणेशोत्सवाने आपल्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यावेळी देखील फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करत आपलं शोषण करणारे इंग्रज गणेशोत्सवाला विरोध करत होते. आजही काही सत्तापिपासू लोक आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा गणेशपूजेवर आक्षेप आहे.

हे ही वाचा >> Swati Maliwal attacks Atishi: ‘आतिशीच्या कुटुंबाने अफझल गुरूची फाशी रोखण्याची विनंती केली’, स्वाती मालिवाल यांचे टीकास्र

गणेशोत्सवाला काँग्रेसचा विरोध, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न; मोदींचा आरोप

पंतप्रधान म्हणाले, “इंग्रजांचाही गणेशोत्सव साजरा करण्यास विरोध होता. तशाच प्रकारचा विरोध आजही पाहायला मिळतोय. आजही काही लोक समाजात फूट पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आमचे सण साजरे करण्यावर आक्षेप आहे. मी गणपत्ती बाप्पाची आरती केली, गणेश पूजेत सहभागी झालो त्यामुळे काँग्रेस हताश झाली आहे. कर्नाटकमध्ये या लोकांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीला तुरुंगात टाकलं. यांचा हा तिरस्कार देशासाठी खूप घातक आहे”.