Sachin Pilot on Narendra Modi PM post and CEC Resignation Demand: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ आता मर्यादित राहिला असून ते ‘लवकरच माजी पंतप्रधान’ होणार आहेत”, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी लगावला आहे. देशभरातील युवकांमध्ये ‘मतचोरी’विरोधात संतापाची लाट असून, पोलीस बळाचा वापर करून किंवा लाठीचार्ज करून हा आवाज दडपता येणार नाही; उलट या जनआंदोलनाने विरोधकांना नवी ऊर्जा दिली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
‘पीटीआय व्हिडिओज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. “देशात जर उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला जाऊ शकतो, तर मुख्य निवडणूक आयुक्त का राजीनामा देऊ शकत नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘सामना आणि पंच फिक्स असतील तर खेळण्यात अर्थ काय?’
निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरकारभारावर बोट ठेवत पायलट म्हणाले, “जर मॅच फिक्स असेल आणि अंपायरही फिक्स असतील, तर तो सामना खेळण्यात खेळाडूंना किंवा पाहण्यात प्रेक्षकांना काय रस उरणार? जय-पराजय हा खेळाचा भाग असतो; आमची मागणी फक्त निपक्षपाती लढतीची आहे. मुख्य निवडणूक आयुक्त जर निष्पक्ष निवडणुकांची खात्री देऊ शकत नसतील, तर त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.”
निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा कोणताही विचार काँग्रेस करत नसून, असा निर्णय घेणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयावर काँग्रेसचा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले. पायलट म्हणाले, “सर्वोच्च न्यायालय ही देशातील सर्वोच्च संस्था आहे. आम्ही सुरुवातीला मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नैतिक विवेकाला आवाहन केले होते. लोकशाहीत निदर्शने, धरणे आणि पदयात्रा काढणे हा जनतेचा घटनादत्त अधिकार आहे. क्रूर पोलीस बळाचा वापर करून लोकांचा आवाज कसा दाबता येईल? नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या वेळीही जनरेट्यामुळेच शिक्षणमंत्र्यांना पायउतार व्हावे लागले होते. निवडणूक आयुक्तांनी जे केले आहे ते बेकायदेशीर असून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे.”
‘स्वायत्त संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न’
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत पायलट म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरे भाजपाचे प्रवक्ते देतात, हे अनाकलनीय आहे. देशातील घटनात्मक संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
सचिन पायलट पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वीच या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले होते. आज सत्य समोर येत असून विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त होते, याची जाणीव आता जनतेला होत आहे.
२०२९ चे नेतृत्व आणि व्यापक विरोधकांची मोट
राहुल गांधी २०२९ च्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे पंतप्रधानपदाचे चेहरा असतील का, या प्रश्नावर पायलट म्हणाले, “राहुल गांधी यांनी स्वतःहून कधीही त्या पदाची आकांक्षा व्यक्त केलेली नाही. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते असून ‘इंडिया’ आघाडी आणि भाजपाविरोधी पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली संसदेत एकजुटीने काम करत आहेत. मतचोरीविरोधातील लढ्यात त्यांनी सुरुवातीपासूनच न डगमगता नेतृत्व केले आहे.”
या आंदोलनात विरोधी पक्षांसह विद्यार्थी नेत्या नेहा बोरा तसेच नागरी संघटनांच्या सहभागाविषयी विचारले असता पायलट म्हणाले, “ज्यांचा भारताच्या लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे आणि जे न्याय व सत्याच्या बाजूने उभे आहेत, ते सर्व या लढ्याचा भाग आहेत. ‘इंडिया’ आघाडी, बिगर-भाजपा पक्ष आणि नागरी समाज या सर्वांना एकत्र येऊनच लोकशाहीचे रक्षण करावे लागेल.”
