वॉशिंग्टन डी सी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या शासकीय दौऱ्यात (स्टेट व्हिजिट) अमेरिकेच्या कायदेमंडळासमोर म्हणजेच काँग्रेससमोर भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी हे २२ जूनला काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये भाषण करतील अशी माहिती अमेरिकी काँग्रेसच्या नेत्यांनी दिली.
‘काँग्रेसचे कनिष्ठ सभागृह असलेले हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि वरिष्ठ सभागृह असलेले सिनेट यांच्या द्विपक्षीय नेतृत्वाच्या वतीने आपल्याला (पंतप्रधान मोदी) २२ जून रोजी काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित करण्याचे आमंत्रण देत आहोत’ असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हाऊस स्पीकर केविन मॅकार्थी, सिनेटचे चक शूमर, सिनेटचे रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल आणि डेमोक्रॅटिकचे हाऊस नेते हकीम जेफरीज यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. काँग्रेसच्या संयुक्त सत्रासमोर भाषण करण्याचा बहुमान पंतप्रधान मोदी यांना दुसऱ्यांदा मिळत आहे.



