दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानात आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तोफ कडाडली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना झोप येत नाही. त्यामुळेच ते सतत रागात असतात. पोस्टरवरील राजकारणावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले की, “१०० वर्षांपूर्वी इंग्रजांनीदेखील पोस्टर लावण्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली होती.”
केजरीवाल म्हणाले की, “भगत सिंग यांनी विचारदेखील केला नसेल की, १०० वर्षांनी भारताला असा पंतप्रधान मिळेल जो पोस्टर लावण्याप्रकरणी कलम १३८ अंतर्गत गुन्हा नोंदवेल.” केजरीवाल यांचं हे वक्तव्य दिल्लीत लावलेल्या ‘मोदी भगाओ, देश बचाओ’ या पोस्टरबाबत होतं.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “देशात एखाद्या महिलेसोबत एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलीस एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करतात. चोरी, खून, दरोडा तसेच इतर गुन्ह्यांच्या प्रकरणात पोलीस एफआयआर दाखल करत नाहीत. परंतु दिल्लीत पोस्टर लावल्यामुळे २४ तासांच्या आत गुन्हा दाखल झाला.”
हे ही वाचा >> संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार
गुजरातमध्ये सर्वाधिक मोठा मद्य घोटाळा
मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सध्या सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात आहेत. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, “मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या दोघांनी एक पैशाचा गैरव्यवहार केलेला नाही. तरीदेखील त्यांना तुरुंगात डांबलं आहे. सर्वात जास्त आणि मोठे मद्य घोटाळे गुजरातमध्ये झाले आहेत. तरीदेखील केंद्र सरकार यावर शांत आहे.”