“आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत हा १४० कोटी जनतेच्या आकांक्षांचा आणि स्वप्नांचा देश आहे,” असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्वीडनमधील ‘युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री’ या नामांकित उद्योग परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून, नेदरलँड्सचा दौरा आटोपून ते स्वीडन मधील गॉथनबर्ग येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
आकाशात लढाऊ विमानांची मानवंदना, विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत
पंतप्रधान मोदींचे विमान स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच, स्वीडनच्या हवाई दलाच्या ‘ग्रिपेन’ (Gripen) लढाऊ विमानांनी त्यांना हवेतच एस्कॉर्ट करत विशेष मानवंदना दिली. गॉथनबर्ग विमानतळावर उतरल्यानंतर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवत स्वतः उपस्थित राहून मोदींचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.
विमानतळानंतर गॉथनबर्गमधील भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींचे अभूतपूर्व स्वागत केले. मोठ्या संख्येने जमलेल्या अनिवासी भारतीयांनी (Diaspora) ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे, या स्वागत समारंभाला स्वीडनचे पंतप्रधान क्रिस्टरसन हे देखील उपस्थित होते. यातून भारत आणि स्वीडनमधील दृढ होत चाललेल्या मैत्रीचे संकेत मिळत आहेत.
स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान; मोदींचा ३१ वा जागतिक गौरव
या दौऱ्यात पंतप्रधान मोदींना स्वीडनचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार’ (Commander Grand Cross) प्रदान करण्यात आला. कोणत्याही परदेशी राष्ट्रप्रमुखाला दिला जाणारा हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान आहे. पंतप्रधानांना मिळालेला हा ३१ वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान ठरला आहे. याशिवाय, दोन्ही देशांमधील संबंधांना आता ‘धोरणात्मक भागीदारी’चे रूप देण्यात आले असून, सुरक्षा, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रांसाठी ‘२०२६-२०३० संयुक्त कृती आराखडा’ मंजूर करण्यात आला आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान हे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यासह युरोपमधील आघाडीच्या उद्योगपतींच्या परिषदेला संबोधित करणार आहेत.
नेदरलँड्स दौऱ्यात १७ महत्त्वाचे करार; गुजरातच्या ‘कल्पसर’ प्रकल्पाला गती
स्वीडनला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी नेदरलँड्सच्या दोन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यावर होते. तिथे डच पंतप्रधान रॉब जेटन यांनी स्वतः ॲमस्टरडॅम विमानतळावर येऊन मोदींना निरोप दिला. नेदरलँड्स दौऱ्यात भारत आणि नेदरलँड्स दरम्यान संरक्षण आणि महत्त्वपूर्ण खनिजांसह (Critical Minerals) विविध क्षेत्रांतील १७ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील तणावावर चिंता व्यक्त करत, याचा जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापारावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली.
गुजरातच्या ‘कल्पसर’ प्रकल्पासाठी मदत
पंतप्रधान मोदींनी डच पंतप्रधानांसह तिथल्या ऐतिहासिक ‘अफ्स्लुइटडिज्क धरणाला’भेट दिली. नेदरलँड्सचे पाणी व्यवस्थापन आणि हवामान-अनुकूल पायाभूत सुविधांमधील तंत्रज्ञान भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः गुजरातच्या खंभातच्या आखातात ३० किलोमीटर लांबीचे धरण बांधून गोड्या पाण्याचा अथांग साठा निर्माण करणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘कल्पसर प्रकल्पासाठी’ही भेट मैलाचा दगड ठरणार आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नेदरलँड्सचे आभार मानले असून, “या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांना एक नवी गती मिळाली असून जलसंपदा, सेमीकंडक्टर्स, इनोव्हेशन आणि हायवे मोबिलिटी क्षेत्रात सहकार्याचा नवा रोडमॅप तयार झाला आहे,” असा विश्वास व्यक्त केला आहे. युएई (UAE) आणि नेदरलँड्सचा दौरा यशस्वी केल्यानंतर पंतप्रधानांचा हा स्वीडन दौरा देखील भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
