पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांची पुन्हा आगळीक
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरक्षाविषयक चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तानने प्रक्षोभक वक्तव्ये करण्याची आगळीक केली आहे. पाकिस्तानसमवेत कोणत्या मुद्दय़ांवर चर्चा करावी याचे फर्मान सोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याचे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे. मात्र काश्मीरच्या मुद्दय़ाचा अंतर्भाव नसल्यास कोणतीही चर्चा होणार नाही, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली आहे.
पाकिस्तानविरोधी सूर आळवून मोदी यांनी निवडणूक लढविली आणि आता त्यांना चर्चेत कोणते मुद्दे असावे याचेही फर्मान सोडावयाचे आहे, मात्र आम्ही ते कधीही मान्य करणार नाही आणि तसे भारताला कळविले आहे, असेही अझीझ म्हणाल्याचे ‘डॉन न्यूज’ने म्हटले आहे.
भारताने कोणत्याही प्रकारची आगळीक केल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, अशी दर्पोक्तीही अझीझ यांनी केली आहे. काश्मीर प्रश् नावर चर्चा करण्यास भारताने नकार दिल्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द झाली, असेही ते म्हणाले. काश्मीरच्या मुद्दय़ाचा अंतर्भाव नसल्यास भारतासमवेत कोणतीही चर्चा यशस्वी होणार नाही.

दाऊद पाकिस्तानात असल्याच्या आरोपाचे खंडन
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याच्या भारताच्या आरोपाचे अझीझ यांनी खंडन केले. मोदी सरकारचे धोरण पहिल्या दिवसापासूनच पाकिस्तानविरोधी आहे, असेही ते म्हणाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताकडून गोळीबार केला जात असल्याचा आरोपही अझीझ यांनी केला. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात चर्चा करून सीमेवरील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.