जंगीपूर (प. बंगाल) : पश्चिम बंगालमधील घुसखोरीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली आणि तुष्टीकरणाचे राजकारण संपवण्यासाठी समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याचे आश्वासन दिले. राज्यात बंगालींना अल्पसंख्याक होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. 

मुर्शिदाबाद जिल्ह्यतील जंगीपूर येथे प्रचारसभेत बोलताना पंतप्रधानांनी आगामी विधानसभा निवडणुका या पश्चिम बंगालची ओळख आणि भविष्य वाचवण्याची लढाई असल्याचा दावा केला.  तृणमूल काँग्रेसने आपला जुना ‘माँ-माटी-मानुष’ हा नारा सोडून दिला असून आता सत्ता टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्ष घुसखोरांवर आणि मतपेढीच्या राजकारणावर अवलंबून आहे, असे मोदी म्हणाले.

ही निवडणूक केवळ सत्तापरिवर्तनापुरती मर्यादित नाही. हे पश्चिम बंगालची अस्मिता जपण्यासाठी दिलेले एक मत आहे. पश्चिम बंगालने आता आपला निर्धार पक्का केला आहे. आपली अस्मिता आणि भविष्यासाठी, पश्चिम बंगाल नक्कीच परिवर्तन घडवून आणेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘उमेदवारी रद्द करण्याचा प्रयत्न’

कोलकाता : भाजपने दोन खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करून, दक्षिण कोलकातामधील भवानीपूर जागेवरून उमेदवारी रद्द करवून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हा डाव उधळून लावला, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पश्चिम मिदनापूर जिल्ह्यतील केशियरी येथील सभेत बोलताना केला. या वेळी त्यांनी भाजपवर  मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेदरम्यान ९० लाख मतदारांची नावे मतदार यादीतून ‘बळजबरीने’ वगळल्याचा आरोपही केला. लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून जिंकण्याची हिंमत नसल्यामुळे, कपटी मार्गांनी बळजबरीने मते मिळवण्याचा कट भाजपने रचल्याचा दावादेखील त्यांनी या वेळी केला.

बंगालचा इतिहास हेच दर्शवतो की, जेव्हा तो परिवर्तनाचा निर्धार करतो, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी बंगालला आव्हान दिले, त्यांचा अहंकार धुळीस मिळाला; मग ते ब्रिटिश असोत, काँग्रेस असो किंवा डावे पक्ष… आता तृणमूलची वेळ आहे  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान