कोलकाता : मालद्यात न्यायालयीन अधिकाऱ्यांना तासन् तास घेराव घालून अडवण्यात आले. ही घटना राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीचे उदाहरण आहे. न्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिक सुरक्षित कसे राहतील? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
मालद्यात जे घडले, ते तृणमूल काँग्रेसच्या ‘महाजंगलराज’चे ज्वलंत उदाहरण आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करत मोदी म्हणाले की, राज्य सरकार कोणत्याही संवैधानिक संस्थेला महत्त्व देत नाही. तृणमूल काँग्रेसच्या निर्दयी कारभाराखाली बंगालच्या पवित्र भूमीवर लोकशाही रोज रक्तबंबाळ होत आहे, असा आरोप त्यांनी केला. परिस्थिती इतकी बिघडली आहे की सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागल्याचे ते म्हणाले.
सीमावर्ती भागात धोकादायक लोकसंख्यात्मक बदल होत आहेत. घुसखोरांना तृणमूल कॉँग्रेसच्या यंत्रणेचे संरक्षण मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच सीएए आणि एसआयआर प्रक्रियेा विरोध करून तृणमूल काँग्रेस घुसखोरांचे संरक्षण करत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला.
