PM Narendra Modi emerges as the world’s most popular leader : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जागतिक ख्याती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेतील ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या डेटा अॅनालिटिक्स फर्मने प्रसिद्ध केलेल्या ताज्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वात लोकप्रिय लोकशाहीवादी नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात त्यांना ६८ टक्के इतके प्रभावी ‘अप्रूव्हल रेटिंग’ (पसंती रेटिंग) मिळाले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांना अवघे ३९ टक्के अप्रूव्ल रेटिंग्स मिळाले आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
“ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकर”चा भाग असलेल्या या आकडेवारीनुसार, मोदींची देशांतर्गत लोकप्रियता आणि वाढती आंतरराष्ट्रीय ओळख यामुळे ते इतर मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थांमधील नेत्यांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग ६२ टक्के रेटिंगसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. हे रेटिंग २ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे.
इतर जागतिक नेत्यांची स्थिती
या ट्रॅकरने पंतप्रधान मोदी आणि इतर प्रमुख पाश्चात्य नेत्यांच्या लोकप्रियतेमधील मोठा फरक स्पष्ट केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अप्रूव्हल रेटिंग’ ३९ टक्के आहे, तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना केवळ २४ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.दुसरीकडे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची लोकप्रियता सर्वात कमी असलेल्या नेत्यांमध्ये गणना झाली असून, त्यांना केवळ १७ टक्के पसंती मिळाली आहे, तर ७५ टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे. मॉर्निंग कन्सल्टनुसार, पंतप्रधान मोदींचे नेट रेटिंग अत्यंत सकारात्मक आहे; केवळ २६ टक्के लोकांनी त्यांना नापसंती दर्शवली आहे, जी इतर नेत्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. याआधी जुलै २०२५ मध्ये झालेल्या सर्वेक्षणातही ७५ टक्के रेटिंगसह मोदींचे वर्चस्व कायम होते. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ४४ टक्के रेटिंगसह आठव्या स्थानावर होते.
ऐतिहासिक टप्पा
मे २०२४ मध्ये सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणाऱ्या नरेंद्र मोदींनी नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान म्हणून कार्यकाळाचे ८,९३१ दिवस पूर्ण करून त्यांनी इंदिरा गांधी यांना मागे टाकले आहे. आता ते अखंड कार्यकाळात भारताचे दुसरे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान ठरले आहेत. या बाबतीत आता त्यांच्यापुढे केवळ देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत.
पंतप्रधान मोदी युद्धविराम घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात
तर, अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान मोदी युद्धविराम घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अमेरिकेच्या माजी लष्कर अधिकाऱ्याने मोदींवर विश्वास व्यक्त करताच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
