मध्य प्रदेशातील बरगी धरणाजवळ नर्मदा नदीत गुरुवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. पर्यटकांनी भरलेली एक क्रूझ बोट वादळी वाऱ्यामुळे नदीत उलटली. या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, आज सकाळी बचाव पथकाला एका आई आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही त्या मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी त्याला छातीशी घट्ट कवटाळून धरले होते, हे दृश्य पाहून बचावकर्त्यांचेही डोळे पाणावले.
दिल्लीच्या कुटुंबावर काळाचा घाला
हे मृत मायलेक दिल्लीहून आलेल्या एका पर्यटकांच्या कुटुंबातील होते. हे चार जणांचे कुटुंब सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आले होते. मात्र, निसर्गाच्या कोपापुढे त्यांचा आनंद विरला. या अपघातातून वडील आणि मुलगी सुदैवाने सुखरूप बाहेर पडले आहेत, परंतु आई आणि मुलाचा करुण अंत झाला.
डोळ्यासमोर कुटुंब वाहून गेले
या दुर्घटनेतून बचावलेले सय्यद रियाझ हुसेन यांनी आपला थरारक अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘अचानक हवामान बिघडले आणि सोसाट्याचा वारा सुटला. काही कळायच्या आत बोट हेलकावे घेऊ लागली आणि त्यात पाणी भरू लागले. सगळीकडे किंकाळ्या आणि रडण्याचा आवाज येत होता. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच माझी पत्नी, सासू आणि नातू लाटांसोबत वाहून गेले.’
हुसेन स्वतः दोन तास मृत्यूशी झुंज देत होते. त्यांनी सांगितले की, ‘मी पाण्यात अडकलो होतो, फक्त माझे डोके पाण्याच्या वर होते. माझ्या समोरून मृतदेह वाहत जात होते. तब्बल दोन तासांनी बचाव पथकाने मला पाहिले आणि माझे प्राण वाचले.’ हुसेन यांचे कुटुंबीय अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
बचावकार्य आणि सद्यस्थिती
शुक्रवारी सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने आतापर्यंत २४ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्यापैकी १७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप नऊ जण बेपत्ता असून, त्यामध्ये पाच बालकांचा समावेश आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (SDRF) पथक, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, क्रूझचा कॅप्टन महेश पटेल याने लाइफ जॅकेट घातले असल्याने तो या अपघातातून सुखरूप वाचला आहे.
या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या नियमावलीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी पाणबुड्यांचीही मदत घेतली जात आहे. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
