अहमदाबादमधील नर्मदा विद्यापीठात आयोजित एका स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान प्राध्यापक आणि विद्यार्थ्यामध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राध्यापक मंचावर बोलत असताना एका विद्यार्थ्याने ‘जल्दी कर, पनवेल निकलना है’ असा आवाज दिला. हा ‘गोलमाल ३’ चित्रपटातील लोकप्रिय संवाद आहे. विद्यार्थ्याच्या या टोमण्यामुळे प्राध्यापक संतापल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने आले आहे.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्याला स्टेजवर बोलावलं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओनुसार, विद्यार्थ्याला प्राध्यापकांनी स्टेजवर बोलावले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्याची कॉलर पकडत त्याला सुनावले.

“मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. नर्मदा विद्यापीठाच्या कॅम्पसमधील कोणत्याही प्राध्यापकाचा अपमान करण्याची हिंमत केली, तर तुमचं सर्व काही संपेल,” असे प्राध्यापक व्हिडीओमध्ये म्हणताना ऐकू येतात. या घटनेनंतर कार्यक्रमातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

कॉमेडियन राजत सूदही मंचावर उपस्थित

ही घटना विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘टेक्नोफोरा २०२६’ या तीन दिवसीय कार्यक्रमादरम्यान घडली. हा कार्यक्रम १८ ते २० सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजत सूद सहभागी झाले होते. शायरी आणि विनोदाचा अनोखा मिलाफ असलेल्या त्यांच्या शैलीला ‘पॉमेडी’ म्हणून ते ओळखले जातात.

व्हिडीओमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्याची कॉलर पकडून त्याला खडसावत असल्याचे दिसत होते, तर दुसरीकडे रजत सूद मंचावरून खाली उतरून प्रेक्षकांना अभिवादन करताना दिसले.

‘एनएसयुआय’कडून प्राध्यापकांच्या वर्तनावर आक्षेप

या घटनेनंतर काँग्रेसशी संलग्न विद्यार्थी संघटनेने प्राध्यापकांच्या वर्तनावर आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. ‘एनएसयुआय’चे राष्ट्रीय समन्वयक भाविक सोलंकी यांनी विद्यार्थ्यासोबत अयोग्य पद्धतीने वर्तन झाल्याचा दावा करत प्राध्यापकांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ‘एनएसयुआय’कडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्याच्या वादाची चर्चा सुरू झाली असून, विद्यापीठाकडून या प्रकरणी अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.