नरोडा-पाटिया हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी गुजरात सरकार न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे. या खटल्यातील दोषी भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री माया कोडनानी, बजरंग दलाचे नेते बाबू पटेल ऊर्फ बजरंगी यांच्यासह इतर दोषींना विशेष न्यायालयाने गेल्यावर्षी शिक्षा ठोठावली आहे. या दोघांसह दहा जणांना कठोर शिक्षा देण्याची मागणी राज्य सरकार न्यायालयाकडे करणार आहे.
विशेष न्यायालयाने ऑगस्ट २०१२ मध्ये दिलेल्या निकालात माया कोडनानी यांना २८ वर्षांची तर बजरंगी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी करण्यासाठी गुजरात सरकारने न्यायालयात याचिका दाखल केली. अहमदाबाद शहराच्या सीमेवर असलेल्या नरोडा पाटिया उपनगरात गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत ९७ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता.
हत्याकांडाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या इतर २२ दोषींची शिक्षा आणखी वाढवावी, अशीही मागणी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. विशेष न्यायालयाने निर्दोष म्हणून सुटका केलेल्या सात आरोपींच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात येईल. विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल कऱण्यासाठी राज्य सरकारला गुजरात उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.