नासा म्हणजे नॅशनल अ‍ॅरॉनाटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकी अंतराळ संस्थेने मंगळाच्या वातावरणाचे संशोधन करण्यासाठी मावेन नावाचे मानवरहित अंतराळयान सोडले आहे. आपल्या शेजारी असलेल्या मंगळाने पाणी व जीवसृष्टीस आवश्यक असलेली उष्णता कशी गमावली याचा शोध हे यान घेणार आहे. द व्हाइट अ‍ॅटलास व्ही ४०१ या अग्निबाणाच्या मदतीने मार्स अ‍ॅटमॉस्फिअर अँड व्होलाटाईल इव्होल्यूशन (मावेन) हे यान भारतीय प्रमाणवेळेनुसार ११.५८ वाजता सोडण्यात आले.
सर्व काही ठीक आहे असे मोहीम नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. यानाचा एकूण खर्च ६७१ दशलक्ष डॉलर इतका असून ते दहा महिन्यांच्या प्रवासानंतर मंगळावर पोहोचणार आहे. नासाच्या इतर मोहिमांपेक्षा हे यान वेगळे संशोधन करणार असून यावेळी मंगळाच्या कोरडय़ा भागाचे संशोधन न करता मंगळाच्या आतापर्यंत अभ्यास न केलेल्या वातावरणातील वरच्या थराचे संशोधन केले जाणार आहे.
 कॅलिफोर्निया विद्यापीठाने तयार केलेले सोलर विंड अँड आयनोस्फिअर गेज म्हणजे पार्टिकल अँड फील्ड्स पॅकेज हे उपकरण तसेच कोलोरॅडो विद्यापीठाचे लॅबोरेटरी फॉर अ‍ॅटमॉस्फेरिक अँड स्पेस फिजिक्स हे उपकरण तसेच न्यूट्रल गॅस अँड आयन मास स्पेक्ट्रोमीटर हे नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे तिसरे उपकरण यांचा समावेश त्यात आहे. मावेनच्या मदतीने आतापर्यंत न शोधलेल्या मंगळाच्या भागाचा शोध घेतला जाणार आहे, असे मुख्य संशोधक ब्रुस जाकोस्की यांनी सांगितले. नासाने यापूर्वी अ‍ॅपॉरच्युनिटी व क्युरिऑसिटी या दोन गाडय़ा मंगळावर पाठवलेल्या आहेत.

मावेन प्रकल्प
मावेन यान मंगळाभोवती ६००० किलोमीटर उंचीवरून प्रदक्षिणा करणार असून मंगळाच्या वातावरणात ते १२५ कि.मी. उंचीवर जाऊन ते निरीक्षण नोंदवणार आहे. एकेकाळी पाणी व जीवसृष्टीस अनुकूल स्थिती असलेल्या या ग्रहावरचे पाणी नेमके कुठे गेले याचा शोध यात घेतला जाणार आहे. मंगळाच्या वातावरणातील एका भागाचा ऱ्हास झाल्याने हे घडून आले असे म्हटले जाते तो भाग नेमका कसा नष्ट झाला. याचाही शोध घेतला जाईल.