ह्युस्टन : नासाच्या ‘आर्टेमिस-टू’ मोहिमेवर चंद्राच्या पलीकडच्या बाजूने पृथ्वीवर परतणार्‍या चार अंतराळवीरांनी बुधवारी अंतराळातून घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या अभूतपूर्व प्रवासाचे अनुभव सांगतानाच वातावरणात ‘फायरबॉल’ (अग्निगोळा) म्हणून प्रवेश करण्याच्या तयारीबद्दल माहिती दिली.

गेल्या आठवड्यात फ्लोरिडा येथून प्रक्षेपित झाल्यापासून आपल्या ‘ओरियन’ कॅप्सूलमध्ये प्रवास करणारे हे अंतराळवीर, या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रावर पोहोचले. यानंतर शुक्रवारी सायंकाळी ते दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर उतरणार आहेत. त्यांनी चंद्राच्या अंधार्‍या बाजूने प्रवास केला, याद्वारे ते इतिहासातील सर्वात लांबवर प्रवास करणारे मानव ठरले आहेत. परतीच्या प्रवासात, पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्यांचा वेग ताशी २३,८३९ मैल (३८,३६५ किमी) इतका असेल. हा मोहिमेचा अत्यंत जोखमीचा टप्पा असेल, जिथे वातावरणातील घर्षणामुळे ओरियनच्या ‘हीटशील्ड’ची खरी परीक्षा असेल.

मोहिमेचे वैमानिक व्हिक्टर ग्लोव्हर यांना परतीच्या प्रवासाबद्दल काय वाटते असे विचारले असता, ‘३ एप्रिल २०२३ रोजी जेव्हा आमची या मोहिमेसाठी निवड झाली, तेव्हापासून मी खरोखर या मोहिमेचा विचार करत आहे. अद्याप सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आपण कशातून गेलो आहोत याची प्रक्रिया अद्याप माझ्या मनात पूर्ण झालेली नाही.

आपल्याकडे अजून दोन दिवस आहेत आणि वातावरणातून एखाद्या अग्निगोळ्यासारखे खाली येणे हे खूप सखोल अनुभवासारखे असेल.’ ग्लोव्हर यांच्याबरोबर नासाचे अंतराळवीर रीड वाईजमन, ख्रिस्तिना कॉख आणि कॅनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सन आहेत. सर्व अंतराळवीर शुक्रवारी रात्री ८ वाजता सॅन डिएगोच्या किनारपट्टीवर समुद्रात उतरून आपली १० दिवसांची मोहीम पूर्ण करतील. सोमवारी या अंतराळवीरांनी पृथ्वीपासून साधारण २,५२,००० मैलांचे अंतर गाठून नवा विक्रम प्रस्थापित केला.