NASA astronaut Anil Menon space vote video : मतदानासाठी सहसा मतदारांना मतदान केंद्रावर जावे लागते. मात्र, अंतराळवीरांसाठी ही प्रक्रिया पृथ्वीपासून सुमारे ४०० किलोमीटर उंचीवर असलेल्या अंतराळ स्थानकातूनही पार पाडता येते. भारतीय वंशाचे नासाचे अंतराळवीर अनिल मेनन यांनी अंतराळातून अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत मतदान केले आहे. मेनन यांच्यासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर असलेल्या अन्य दोन अमेरिकन अंतराळवीरांनीही मतदानाचा हक्क बजावला. अंतराळातून मतदान करतानाचा मेनन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
अनिल मेनन यांनी मंगळवारी ‘एक्स’वर हा व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते अंतराळ स्थानकातील आपल्या क्रू कॉर्टर्समध्ये दिसत आहेत. याच जागेचा वापर त्यांनी मतदान केंद्र म्हणून केला. आपण टेक्सासमधील मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान करत असल्याचे त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले.
लॅपटॉपवर इलेक्ट्रॉनिक मतपत्र भरून केले मतदान
अंतराळातून मतदान करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडते. अंतराळवीरांना सुरक्षित इलेक्ट्रॉनिक मतपत्र दिले जाते. ते अंतराळ स्थानकात लॅपटॉपच्या मदतीने मतपत्र भरतात आणि त्यानंतर नासाच्या सुरक्षित संपर्क यंत्रणेद्वारे ते पृथ्वीवरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवले जाते.
या प्रक्रियेबाबत माहिती देताना मेनन म्हणाले, “होय, अंतराळातूनही मतदान करता येते. अंतराळ स्थानकावरील आम्हा तिन्ही अमेरिकन अंतराळवीरांना अंतराळातून मतदान करण्याची संधी मिळाली. आम्ही इलेक्ट्रॉनिक मतपत्र भरले आणि सुरक्षित पद्धतीने ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवले.”
“अंतराळातून मतदान? हे किती भन्नाट आहे”
मेनन यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका युजरने विनोद करत म्हटले की, “तीन अंतराळवीरांनी अंतराळातून मतदान केले. पण, काल माझ्या लॅपटॉपपासून अवघ्या तीन फूट अंतरावर असलेल्या प्रिंटरला जोडण्यासाठी मला ४० मिनिटे लागली. आता मी नासामध्ये अर्ज करणार आहे, तिथले तंत्रज्ञान तरी अधिक विश्वासार्ह दिसते.”
दुसऱ्या एका युजरने अंतराळातून मतदान केल्यामुळे मिळणारे ‘आय व्होटेड’ स्टिकर हे आतापर्यंतचे सर्वात भन्नाट स्टिकर असल्याची टिप्पणी केली; तर आणखी एका युजरने “काय सांगता! मला याबद्दल माहितीच नव्हते. किती छान!” अशी प्रतिक्रिया दिली.
१९९७ पासून अंतराळातून मतदानाची सुविधा
अंतराळातून मतदान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या विधिमंडळाने १९९७ मध्ये अंतराळवीरांना अंतराळातून मतदान करण्याची परवानगी देणारा कायदा मंजूर केला होता. त्याच वर्षी नासाचे अंतराळवीर डेव्हिड वुल्फ यांनी मीर अंतराळ स्थानकावरून मतदान केले होते. अंतराळातून मतदान करणारे ते पहिले अमेरिकन अंतराळवीर ठरले.
