माणसाला मंगळावर अवघ्या ३९ दिवसांत पोहोचवू शकणाऱ्या यंत्रासाठी नासाने १० दशलक्ष डॉलर अनुदान दिले आहे. ज्या कंपनीस हे अनुदान मिळाले आहे ती टेक्सासची असून तिचे नाव अ‍ॅड अस्त्र रॉकेट कंपनी असे आहे, ही कंपनी माणसाला ३९ दिवसांत मंगळावर नेऊन सोडणारे वासिमर यंत्र तयार करीत असून त्यात प्लाझ्मा (आयनद्रायु) वापरण्यात आला आहे.
 प्लाझ्मा म्हणजे विद्युतभारित वायू असून त्याचा इंधन म्हणून वापर करण्यात आला आहे. हा अग्निबाण इतर अग्निबाणांसारखा नसून तो प्लाझ्मा अग्निबाण आहे. या वासिमर रॉकेटचा वापर आतापर्यंत केलेला नाही असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व माजी अवकाशवीर फ्रँकलिन चँग डायझ यांनी सांगितले. वासिमर इंजिनमध्ये प्लाझ्मा जास्त तापमानास रेडिओ लहरींनी तापवला जातो. शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रांच्या मदतीने हा प्लाझ्मा इंजिनमध्ये भरला जातो त्यामुळे जोर निर्माण होतो त्यामुळे इंजिन (अग्निबाण) वेगाने वर जाते. नासा तीन वर्षांत या कंपनीला १० दशलक्ष डॉलर देणार असल्याचे आरटी डॉट कॉमने म्हटले आहे. हे यंत्र व्हीएक्स २०० एसएस नावाने तयार करून १०० तासांच्या उड्डाणासाठी सज्ज केले जाणार आहे. नासा नंतर त्याचा वापर मंगळ मोहिमांसाठी करणार आहे. कंपनीही या इंजिनच्या प्रकल्पासाठी वेगळा विचार करीत आहे. त्याच्या मदतीने लघुग्रहांवर खाणकाम किंवा अवकाशातील धोकादायक लघुग्रह पकडून आणण्यासाठी उपयोग होऊ शकेल.