नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थी प्रचंड संतापले होते. या घटनेनंतर कॉक्रोच जनता पार्टीने देशात आंदोलन उभं केलं. मागील एक महिन्यापासून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी हे विद्यार्थी करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टी ही खरंतर सोशल मीडियावर उभी राहिलेली चळवळ आहे. मात्र CJP ला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. तसंच सोमवारी जो मोर्चा निघाला होता त्यावर लाठी चार्ज करण्यात आल्यानंतर या आंदोलनाचा पाठिंबा आणखी वाढला आहे. अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांनी मुळीच घाबरुन जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हटलंय नसीरुद्दीन शाह यांनी?

मी नसीरुद्दीन शाह आज दोन गोष्टी सांगू इच्छितो पहिली बाब ही आहे की एखादा अज्ञानी माणूस जर देशाचं नेतृत्व करत असेल तर त्याला हेच वाटणार की सगला देश त्याच्यासारखा अज्ञानी, समज नसलेला, लायकी नसलेला आणि क्रूर बनावा. मी अभिनयाचे दोन वेगळे कोर्स केले आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि पुणे फिल्म इन्स्टिट्युटमध्ये. मात्र मी अभिनयाच्या बाबतीत मी सर्वात जास्त कुणाकडून शिकलो असेल तर त्या मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून ज्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा-शाह

विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मी त्यांना दुवा देतो. मी त्यांना सलाम करतो. या वेळी माझं हृदय पिळवटून गेलं आहे आणि माझ्या मनात प्रचंड रागही आहे हे पाहून की आपल्या मुलांसह कशापद्धतीने जुलूम केला जातो आहे. जुलूम करणारे हे गुंड अमेरिकेत मास्क घालून जुलूम करणाऱ्या एजंटसारखेच दिसतात. कधीतरी तुमच्या मुलांबाबतही विचार करा आणि हे लक्षात ठेवा की तुमचाही शेवट होणार आहे. सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो हिंमत हरु नका, अनेक लोकांचा पाठिंबा तुम्हाला आहे. तुम्ही लढत राहा. मला आपल्या देशाच्या तरुणांकडून कायमच अपेक्षा वाटल्या आहेत आणि आता त्या अपेक्षा वाढल्या आहेत. तुम्ही तुमचा लढा सुरु ठेवा आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. या देशाच्या सरकारला इतकंच सांगणं आहे, सब याद रखा जाएगा! असं म्हणत नसीरुद्दीन शाह यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

असा व्हिडीओ नसीरुद्दीन शाह यांनी पोस्ट केला आहे या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी सीजेपीच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. लाठीचार्ज नंतर या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढतो आहे. उद्धव ठाकरे यांनीही जंतरमंतर या ठिकाणी जाऊन या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. तर राहुल गांधी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्याबद्दल त्यांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. आता हे आंदोलन कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.