Nasire Best White House shooter : अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर सिक्रेट सर्व्हिसच्या चेकपॉइंटवर आज पुन्हा गोळीबार झाला. गोळीबार झाला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते. गोळीबार करणाऱ्या बंदूकधाऱ्याची ओळख पटली असू नासीर बेस्ट असं त्याचं नाव असल्याचं वृत्त न्यूयॉर्क पोस्टने दिलं आहे.

येशू ख्रिस्ताचा आधुनिक अवतार

या बंदूकधाऱ्याचा नेमका हेतू अद्याप अस्पष्ट असला, तरी तो मानसिकदृष्ट्या त्रस्त होता आणि चेकपॉईंट्सजवळ घुटमळत असल्यामुळे सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी त्याला अनेकदा हटकलं होतं, असंही वृत्तात म्हटलं आहे. संशयित आरोपीला आपण येशू ख्रिस्ताचा आधुनिक अवतार असल्याचा भ्रम होता, असं तपासकर्त्यांच्या निदर्शनास आलं आहे. यावरून हा हल्ला त्याच्या मानसिक अस्वास्थ्यामुळे झाला असावा, असं दिसून येतंय. यापूर्वी, बेस्टला व्हाईट हाऊसच्या परिसरापासून दूर राहण्याचे न्यायालयीन आदेश देण्यात आले होते. मात्र, २१ वर्षीय बेस्टने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.

२४ मे रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार), सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना बेस्ट १७ व्या स्ट्रीट नॉर्थवेस्ट (17th St. Northwest) येथे विचित्र वर्तन करताना दिसला. त्याने बंदूक काढून काही फेऱ्या झाडल्या, यामुळे एक पादचारी गंभीर जखमी झाला. मात्र, सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करत या माथेफिरू बंदूकधाऱ्याला तात्काळ रोखले. यात बेस्ट जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कोण आहे नासीर बेस्ट?

बेस्ट गेल्या सुमारे १८ महिन्यांपासून वॉशिंग्टन डीसी (Washington, DC) येथे राहत होता. जुलै २०२५ मध्ये त्याचा अमेरिकन गुप्तहेर संघटनेशी (US Secret Service) वाद झाला होता. त्याने व्हाईट हाऊसमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला, यामुळे गुप्तहेर संघटनेने त्याला अटक केली होती. या घटनेनंतर मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे त्याला मानसोपचार विभागात पाठवण्यात आले होते. हा गोळीबार ज्या भागात झाला, त्याच परिसरात यापूर्वीही गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत.

आम्ही जनतेला पुढील माहिती देत राहू

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) चे संचालक काश पटेल या घनटेबाबत म्हणाले की, अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सर्व तपशील समोर आल्यानंतर ते जनतेसोबत शेअर केले जातील. पटेल यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टद्वारे म्हटले की, “एफबीआय घटनास्थळी हजर असून, व्हाईट हाऊसच्या परिसराजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सिक्रेट सर्व्हिसला मदत करत आहे, जशी माहिती मिळेल तशी आम्ही ती जनतेपर्यंत पोहोचवू.”